खंडणीची मागणी करणार्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
फ्लॅटच्या डागडुजीच्या कामाला विरोध करुन धमकी दिली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – खंडणीची मागणी करणार्या दोन महिलांविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविता खरपडे आणि सुमन खरपडे ऊर्फ झुम्मन अशी या दोन्ही महिलांचे नाव आहेत. फ्लॅटच्या डागडुजीच्या कामाला विरोध करुन या दोन्ही महिलांनी दिड लाखांची मागणी करुन तक्रारदारांना धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत दोघीही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
यातील तक्रारदार महेंद्रप्रसाद नंदलाल चौरसिया हे कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहतात. ते त्यांच्या साडूभाऊ पंकजकुमार नाग यांच्या फ्लॅटमध्ये राहतात. या फ्लॅटच्या डागडुगीचे त्यांनी काम घेतले होते. ते काम सुरु असताना ३० जानेवारीला तिथे सुमन आणि तिची सून सविता या दोघीही आल्या होत्या. त्यांनी फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या डागडुजीच्या कामाला विरोध करुन काम थांबविण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर काम करणार्या कामगारांना शिवीगाळ करुन फ्लॅटमधून बाहेर काढले होते. त्यानंतर फ्लॅटला कुलूप लावून निघून गेल्या होत्या. हा प्रकार कामगरांकडून समजताच महेंद्रप्रसाद चौरसिया तिथे गेले आणि त्यांनी दोन्ही महिलांकडे विचारणा केली होती. यावेळी या दोघींनी त्यांना फ्लॅटचे डागडुजीचे काम करण्यासाठी दिड लाखांची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांना तिथे काम करता येणार नाही अशी धमकी दिली होती.
या धमकीनंतर महेंद्रप्रसाद यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सविता खरपडे आणि सुमन खरपडे यांच्याविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपासात महेंद्रप्रसाद हे दोन्ही आरोपी महिलांच्या परिचित असून नातेवाईक असल्याचे बोलले जाते. या दोघींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.