ब्लॅकमेल करुन पोलीस अधिकार्याकडे दहा लाखांची खंडणीची मागणी
फोटो व्हायरल करुन बलात्काराची खोटी तक्रार करण्याची धमकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2025
मुंबई, – ब्लॅकमेल करुन एका पोलीस अधिकार्याकडे दहा लाखांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटी कलमातर्गत गुन्हा दाखल केला आहे. कांचन विजय देसाई, तिची आई शांतीदेवी सरोज, बहिण शिला सरोज आणि भाऊ राजेश ऊर्फ राजू सरोज अशी या चौघांची नावे आहेत. तक्रारदार पोलीस अधिकार्याचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची तसेच त्यांच्याविरुद्ध खोटी बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन या चौघांनी त्यांच्याकडून आतापर्यत दोन लाख सत्तर हजाराची खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांना तपासाचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
यातील तक्रारदार सहाय्यक महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 2012 साली ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी खेरवाडी आणि समतानगर पोलीस ठाण्यात काम केले होते. 2021 रोजी त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली होती. बढतीनंतर त्यांची नांदेड येथे बदली झाली होती. सध्या ते नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. समतानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्यावर बीट क्रमांक एकची जबाबदारी सोपविण्यात ाअली होती. 2019 साली त्यांची कांचन देसाई या महिलेशी ओळख झाली होती. त्यापूर्वी ते तिला कधीच भेटले नव्हते. नंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते. याच दरम्यान ती त्यांना भेटण्यासाठी पोयसर बीट चौकीत आली होती. यावेळी तिने तिचा भाऊ रणजीत हा गांजा पितो, त्याची समजूत काढण्याची विनंती केली होती. एकमेकांच्या संपर्कात असताना तिने त्यांना प्रपोज केले होते. मात्र ते विवाहीत असल्याने त्यांनी तिला सतत कॉल करु नकोस, त्यांची पत्नी रागीट स्वभावाची असून तिला तिचे कॉल आलेले आवडणार नाही असे स्पष्टपणे बजाविले होते. कोरोना काळात बंदोबस्त करताना स्थानिक लोक गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप करत होते. तिथेही कांचन व तिची बहिण शिला येत होते. मार्च 2020 रोजी त्यांची पत्नी तिच्या लातूर येथून माहेरी गेली होती.
अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने तिला मुंबईत येता आले नाही. त्यातच त्यांना कोरोना झाल्याने त्यांना चौदा दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात आले होते. यावेळी कांचनसोबत त्यांचे संभाषण वाढले होते. जून महिन्यांत ती तिचा भाऊ रणजीतसोबत त्यांच्या कांदिवलीतील पोलीस वसाहतीत त्यांना भेटण्यासाठी आली होती. काही वेळाने तिने रणजीतला रुममधून बाहेर जाण्यास सांगितले. तो बाहेर गेल्यानंतर तिने त्यांना तिचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे असे सांगून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तिला नकार देत ते विवाहीत असल्याचे सांगून दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कांचनने ती विवाहीत असून तिचे सासरचे तिला त्रास देतात. तिला तिच्या पतीपासून वेगळे व्हायचे आहे. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. जून महिन्यांत ते त्यांच्या पत्नीला घेऊन मुंबईत आले होते. 28 मार्च 2021 रोजी ते पोईसर बीट चौकीत होते. यावेळी तिथे कांचन ही राजेशसोबत आली. तिने त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली. ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार तसेच त्यांच्या पत्नीला त्यांच्यातील संबंधाची माहिती सांगण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने ते प्रचंड घाबरले. बदनामीच्या भीतीने त्यांनी तिला 75 हजार रुपये दिले होते. त्यानंतर कांचन ही त्यांच्यातील फोटो सोशल मिडीयावर व्हायरलची करण्याची धमकी देऊन त्यांना सतत ब्लॅकमेल करत होती.
ऑगस्ट 2021 रोजी तिने पुन्हा त्यांच्याविरुद्ध तक्रार न करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली होती. यावेळी तिच्यासोबत तिची आई शिला आणि बहिण शिला या दोघीही होत्या. यावेळी त्यांनी तिला पैसे देण्यास नकार देता त्यांनी त्यांना शिवीगाळ करुन त्यांची बदनामीची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी तिला 35 हजार रुपये दिले होते. याच दरम्यान राजेशने त्यांच्या व्हॉटअपवर त्यांचा एक अश्लील फोटो पाठवून तो फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. दुसरीकडे कांचन त्यांना भेटण्यासाठी बोलवत होती. त्यांनी भेटण्यास नकार दिला असता तिने तिच्या हातावर ब्लेडने वार करुन जीव देण्याची धमकी दिली होती. याच दरम्यान त्यांना कांचनचे एका व्यक्तीसोबत शारीरिक संबंध असल्याची माहिती समजली होती. मात्र त्यांनी तिला काहीच सांगितले नाही. दिड महिन्यानंतर कांचनने विषारी किटकनाशक प्राशन केल्याचा सांगून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. सतत कॉल करुन त्यांचा मानसिक शोषण करत होती. वाढवण पोलीस ठाण्यात येऊन तिथे गोंधळ घालण्याची धमकी देत होती. एप्रिल 2023 ती लातूरला येण्यासाठी निघाली होती, यावेळी त्यांनी तिला पाच हजार रुपये पाठवून तिथे न येण्याची विनंती केली.
24 एप्रिल 2023 रोजी त्यांच्या कारला अपघात झाला होता. त्यात त्यांच्या कारचे सहा लाखांचे नुकसान झाले होते. कांचनकडून होणार्या ब्लॅकमेल आणि खंडणीच्या धमकीमुळे ते सतत मानसिक तणावात होते. त्यातून हा अपघात झाला होता. हॉस्पिटलमध्ये असताना कांचन त्यांना भेटण्यासाठी आली होती. यावेळी त्यांनी तिला ब्लॅकमेल करुन खंडणीची मागणी करणे बंद करण्याची विनंती केली, मात्र तिने त्याकडे तिने दुर्लक्ष केले. 5 जून 2023 रोजी तिने त्यांनी तिच्यावर बहिणीच्या घरी जबदस्ती केल्याचा आरोप केला होता, मात्र त्या दिवशी ते वाढवण पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या हत्येसह पुरावा नष्ट केल्याचा एका गुन्ह्यांचा तपास होता. पोलीस ठाण्यात तशी नोंद आहे. तरीही कांचनकडून त्यांच्यावर आरोप सुरु होते. जुलै 2023 रोजी कांचन ही पंधरा ते सतरा दिवस मिसिंग होती. त्याला मीच जबाबदार असल्याचा तिची आई अनिता ऊर्फ शांतीदेवी, भाऊ अॅड राजू आणि बहिण शिला यांनी करुन त्यांचा मानसिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी समतानगर पोलिसांत तिची मिसिंग तक्रार केली होती. मालवणी आणि विरार येथे महिलेचा मृतदेह सापडल्याचे सांगून ते त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. या संपूर्ण प्रकारामुे ते मानसिक तणावात होते. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. कांचन घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी करुन काही रक्कम घेतली होती.
अशा प्रकारे कांचनसह तिच्या कुटुंबियांनी त्यांचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची तसेच बलात्काराची खोटी तक्रार करण्याची धमकी देऊन दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीस्वरुपात दोन लाख ऑनलाईन तर सत्तर हजार कॅश म्हणून घेतले होते. त्यांची सोशल मिडीयावर बदनामी धमकी देत आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर त्यांनी समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कांचन देसाई, शांतीदेवी, शिला आणि राजू या चौघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसह बदनामी करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.