व्यावसायिकाच्या कार्यालयात प्रवेश करुन घरफोडी

एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – एका गंभीर गुन्ह्यांत आर्थर रोड जेलमध्ये असताना एका व्यावसायिकाच्या कांदिवलीतील कार्यालयात प्रवेश करुन आतील सर्व सामानाची चोरी केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध समतानगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. रामचंद्र चौहाण, शेरबहादूर रामचंद्र चौहाण, विनोद रामचंद्र चौहाण आणि नंदकिशोर रामचंद्र चौहाण अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

प्रदीपकुमार राजेंद्रप्रसाद मिश्रा हा कांदिवलीतील आकुर्ली रोड, गायकवाड चाळीत राहतो. त्याचा पॅकर्स ऍण्ड मूव्हर्सचा व्यवसाय आहे. डिसेंबर २०१६ रोजी त्याने विनोद चौहाण याच्याकडून दामूनगरमध्ये एक प्लॉट भाड्याने घेतला होता. तिथे त्याने स्वतचा व्यवसाय सुरु केला होता. २०१६ ते २०२२ या कालावधीत तो तिथे भाड्याने असताना त्याने विनोदने भाडेतत्त्वाची मूळ प्रत दिली नव्हती. तो प्रत्येक वेळेस त्याला झेरॉक्स प्रत देत होता. तीन वर्षांपूर्वी विनोद हा त्याचे वडिल रामचंद्रसोबत त्याच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी आकुर्ली रोड, हनुमान नगर परिसरात एक टू बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. त्यासाठी त्यांना पैशांची गरज असून त्याच्या कार्यालयातील प्लॉट विक्री करणार आहे. त्यामुळे त्याने त्यांना तोच प्लॉट विकत घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु झाला होता. सर्व दस्तावेज बनवून त्याचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याने विनोद आणि शेरबहादूर चौहाण यांना कॅश स्वरुपात ३९ लाख ७० हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्यांनी प्लॉटचा ताबा प्रदीपकुमार मिश्राला दिला होता.

याच दरम्यान त्याच्याविरुद्ध ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. २४ जानेवारी २०२१ ते ७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तो जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. त्यांच्या कार्यालयात पॅकर्स आणि मूव्हर्सचे सर्व सामान होते आणि कार्यालयाची चावी त्यांच्या पत्नीकडे होती. याच दरम्यान चौहाण कुटुंबियांनी त्यांच्या कार्यालयातील कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. त्यांच्या परवानगीशिवाय त्यांनी कार्यालयातील सर्व सामान एका टेम्पोमध्ये भरुन नेला होता. त्यानंतर त्यांच्या कार्यालयात एक भाडेकरु ठेवला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी याबाबत चौहाण कुटुंबियांकडे विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही.

अशा प्रकारे प्रदीपकुमार हा आर्थर रोड जेलमध्ये असताना त्याच्या कार्यालयातील कुलूप तोडून चौहाण कुटुंबियांनी त्यांच्या कार्यालयात सामानाची चोरी केली होती. त्यामुळे त्याने चौहाण कुटुंबियांविरुद्घ समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रामचंद्र चौहाणसह त्याचे तीन मुले शेरबहादूर, विनोद आणि नंदकिशोर चौहाण याच्याविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page