मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ डिसेंबर २०२४
मुंबई, – कांदिवली रेल्वे स्थानक ते महिंद्रा येलोगेट असा रिक्षाने प्रवास करताना रिक्षात विसरलेली बॅग काही तासांत शोधून ती बॅग समतानगर पोलिसांनी संबंधित महिलेच्या स्वाधीन केले. या बॅगेत साडेतीन लाखांचे दागिने आणि सात हजार रुपयांचे नवीन कपडे होते. रिक्षात विसरलेली बॅग आणि आतील मुद्देमाल परत मिळाल्याने या महिलेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व त्यांच्या पथकाचे आभार व्यक्त केले. या कामगिरीबाबत पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनीही या पोलीस पथकाचे कौतुक केले होते.
समिक्षा हर्षद भोगले ही महिला डोंबिवलीतील गणेश कृपा सोसायटीमध्ये राहते. शनिवारी दुपारी एक वाजता ती कांदिवली रेल्वे स्थानक ते महिंद्रा येलोगेट असा रिक्षाने प्रवास करत होती. यावेळी तिच्याकडे एक बॅग होती. या बॅगेत काही नवीन कपडे आणि सोन्याचे दागिने होते. महिंद्रा येलोगेटजवळ येताच रिक्षातून उतरल्यानंतर तिला तिची बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात आले होते. हा प्रकार लक्षात येताच तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना घडलेला प्रकार सांगून तिची बॅग शोधून देण्याची विनंती केली होती. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी त्यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेकर, पोलीस शिपाई राठोड, वारंग आणि साबळे यांनी संबंधित रिक्षाचा शोध सुरु केला होता. कांदिवली रेल्वे स्थानक ते महिंद्रा येलोगेटदरम्यानचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या रिक्षाचा क्रमांक मिळविला. यावेळी रिक्षाचालकाचे नाव कैलास शिरसाट असल्याचे उघडकीस आले. त्याला संपर्क साधून रिक्षातील बॅगेबाबत विचारणा करण्यात आली. त्यानेही रिक्षा बॅग असल्याचे सांगितले. त्यानंतर तो समतानगर पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने ती बॅग पोलिसांच्या स्वाधीन केले. या बॅगेत सात हजार रुपयांचे नवीन कपडे तसेच साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने होते.
ही बॅग नंतर समिक्षा भोगले हिला परत करण्यात आली. तोंडी तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेकर, पोलीस शिपाई राठोड, वारंग आणि साबळे यांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन ही बॅग परत मिळवून दिल्याने तिने संबंधित पोलिसांचे आभार व्यक्त केले.