पंधरा वर्षांच्या अल्पवयीन बहिणीवर भावाकडून लैगिंक अत्याचार
कांदिवलीतील भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2025
मुंबई, – पंधरा वर्षांच्या अल्पवयीन बहिणीवर तिच्याच भावाने लैगिंक अत्याचार केल्याची भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. पिडीत मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच वीस वर्षांच्या आरोपी भावाला समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिडीत मुलगी ही कांदिवली परिसरात राहत असून ती सध्या शिक्षण घेत आहे. आरोपी हा तिचा मोठा भाऊ आहे. जून 2021 रोजी ही मुलगी घरात एकटीच होती. यावेळी त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. तिने विरोध केल्यानंतर तो तिला हाताने आणि झाडून मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यानंतर तो तिच्याशी जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. जिवासह बदनामीच्या भीतीपोटी तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. त्याच्याच त्याने गैरफायदा घेतला होता. जून 2021 ते डिसेंबर 2024 या कालावधीत त्याने अनेकदा तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती दोन महिन्यांची गरोदर राहिली होती.
तिची चौकशी केल्यानंतर तिने तिच्या भावानेच तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर तिने समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या भावाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी भावाला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला मेडीकलसाठी नंतर कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.