पतीच्या आत्महत्येसह पत्नीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा
मृत पतीच्या मोबाईलमधील व्हिडीओमुळे आत्महत्येचा पर्दाफाश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून एका ३७ वर्षांच्या चालकाने त्याच्या कांदिवलीतील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शाम भारत अदमाने असे या चालकाचे नाव असून त्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या पत्नीसह तिच्या कुटुंबियांविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पौर्णिमा आवटे ऊर्फ पौर्णिमा शाम अदमाने , पवन आवटे, प्रशांत आवटे, प्रिती प्रशांत आवटे, मिरा आवटे आणि समाधान भीमराव वाघमारे अशी या सहाजणांची नावे आहेत. शामने त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या आत्महत्येची सर्व हकीकत सांगितली असून या व्हिडीओमुळेच त्याच्या आत्महत्येचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या सर्वांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे. या चौकशीनंतर दोषीवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राम भारत अदमाने हे मूळचे लातूरच्या काळे, भोरचे रहिवाशी असून मजुरीचे काम करतात. त्यांचा मृत शाम हा भाऊ असून तो चालक म्हणून काम करतो. सध्या तो कांदिवलीतील दामूनगर, फरीदी इस्टेट परिसरात राहत होता. २००८ साली त्याचे पुष्पा नावाच्या एका तरुणीसोबत विवाह झाला होता. लग्नाच्या पाच वर्षांनी पुष्पाचा दुसर्या मुलाच्या जन्माच्या वेळेस मृत्यू झाला होता. पुष्पाच्या निधनानंतर त्याने पौर्णिमा आवटे हिच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यांना पुष्पाकडून दोन तर पौर्णिमाकडून एक मुलगा होता. या तिन्ही मुले आणि पत्नीसोबत ते दामूनगर परिसरात राहत होते. मात्र काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक कारणावरुन सतत खटके उडत होते. प्रत्येक वेळेस पतीशी भांडण झाल्यानंतर पौर्णिमा ही तिच्या पुण्यातील माहेरी निघून जात होती. अशा प्रकारे तिने दोन ते तीन वेळा केले होते. यावेळी शाम हा तिची समजूत काढून तिला पुन्हा घरी घेऊन येत होता. ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधनानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. या वादानंतर ती पुन्हा तिच्या माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तो तिला आणण्यासाठी पुन्हा पुण्याला जाणार होता. १३ ऑक्टोंबरला त्यांचा भाचा किशोर दिलीप बलाढे यांनी राम अदमाने यांना कॉल करुन शाम यांनी त्याच्या कांदिवलीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले.
ही माहिती मिळताच राम अदनाने हा लातूर येथून मुंबईत आला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अत्यंविधीसाठी लातूर येथे नेण्यात आला होता. सर्व विधी पार पाडल्यानंतर राम अदमाने यांना शामच्या एका मोबाईलमध्ये एक मोबाईल दिसला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शाम हा १२ ऑक्टोंबरला त्याच्या पत्नीसह मुलाला भेटण्यासाठी पुण्याला गेला होता. यावेळी त्याची पत्नी पौर्णिमा, मेहुणा पवन, प्रशांत, त्याची पत्नी प्रिती, सासू मिरा आणि साडू समाधान वाघमारे यांनी शामला मारहाण केली होती. तसेच त्याला त्याच्या मुलांना भेटू दिले नव्हते. त्यामुळे तो प्रचंड मानसिक नैराश्यात आला होता. मरणाची इच्छा नसताना पत्नीसह तिच्या कुटुंबियांच्या मानसिक शोषणाला आपण आत्महत्या करत आहे असे त्याने व्हिडीओमध्ये म्हटले होते. त्यानंतर शाम हा पुण्यातून मुंबईत आला आणि त्याने दुसर्या दिवशी रात्री साडेदहा वाजता त्याच्या कांदिवलीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
शामचा हा व्हिडीओ समतानगर पोलिसांकडे सोपवून राम अदमाने यांनी त्याच्या पत्नीसह तिच्या कुटुंबियांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पौर्णिमासह तिचे भाऊ प्रशांत, पवन, वहिनी प्रिती, आई मिरा आणि साडू समाधान वाघमारे यांच्याविरुद्ध शामला मारहाण करुन मानसिक शोषण करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या सर्वांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.