कंपनीच्या नावाचा गैरवापर करुन गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणुक
अडीच कोटींच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीस बंगलोरहून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जुलै २०२४
मुंबई, – शहरातील एक नामांकित मोतीलाल ओसवाल नावाच्या कंपनीच्या नावाचा गैरवापर करुन कंपनीच्या नावाने बोगस व्हॉटअप ग्रुप बनवून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन जुहूच्या व्यावसायिकाची सुमारे अडीच कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी एका आरोपीस बंगलोर येथून दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत एस शिवामोडिया असे या आरोपीचे नाव असून तो एस श्रीधर या व्यक्तीच्या सांगण्यावरुन बँक खात्यातील सर्व व्यवहार पाहत असल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत एस. श्रीधर हा मुख्य आरोपी असून त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले.
अनिलकुमार शर्मा हे ६७ वर्षांचे वयोवृद्ध जुहूच्या जेव्हीपीडी, अमोघ वसुंधरा सोसायटीमधील रहिवाशी असून सध्या ते उत्तरप्रदेशच्या नोएडा, सेक्टर क्रमांक १२८ च्या केटी या ठिकाणी राहतात. ८ मे २०२४ रोजी त्यांना एका व्हॉटअप क्रमांकावरुन कल्पना अशोक या महिलेने मोतीलाल ओसवाल कंपनीचे सिक्युरिटी इंस्टिट्युशन खाते उघडण्यासाठी एक पत्र पाठविले होते. त्यामुळे त्यांनी तो फॉर्म भरुन तिला पाठवून दिला होता. त्यानंतर तिला मोतीलाल ओसवाल नावाच्या एका व्हॉटअपमध्ये सामिल करुन घेण्यात आले होते. या ग्रुपमध्ये कंपनीच्या शेअरविषयी माहिती दिली जात होती. सभासदांचा विश्वास बसावा म्हणून ग्रुपमध्ये मोतीलाल ओसवाल कंपनीचे सेबीमध्ये रजिस्ट्रेशनबाबतचे प्रमापत्र टाकण्यात आले होते. हा ग्रुप कंपनीचा अधिकृत ग्रुप असून कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास वीस टक्के नफा शेअर मिळेल, या शेअरच्या मदतीने त्यांना विविध आयपीओ आणि गुंतवणुक करुन चांगला फायदा होईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. ग्रुपमध्ये ही माहिती दिल्यानंतर त्यांना एक लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी तीन लाखांची गुंतवणुक केली होती. त्यात त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांना शेअरमध्ये आणखीन गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल असे सांगण्यात आले होते.
त्यांच्यावर विश्वास ठेवून १३ मे ते १३ जून २०२४ या कालावधीत २ कोटी ४८ लाख ६० हजार गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना २० कोटी रुपयांचा फायदा होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही रक्कम त्यांना ट्रान्स्फर करता आली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना मध्येच ही रक्कम काढता येणार नाही, पैसे काढायचे असल्यास त्यांना २० टक्के रक्कम आधी भरावी लागेल असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मोतीलाल ओसवाल यांच्या कंपनीत कॉल करुन ब्रिजेश भट यांच्याशी चर्चा केली. यावेळी ब्रिजेशने त्यांना मोतीलाल ओसवाल कंपनीचा कुठलाही व्हॉटअप ग्रुप नाही. या ग्रुपच्या माध्यमातून कंपनीने कोणालाही कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले नाही असे समजले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध ४१९, ४२०, ४६८, ४७१, १२० बी भादवी सहकलम ६६ डी, ६६ सी आयटी कलमार्ंगत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यातील सुमारे सोळा लाखांची कॅश होल्ड करण्यात आली. याच खात्यातून अन्य एका बँक खात्यात ८७ लाख १५ हजार रुपये ट्रान्स्फर झाले होते. या बँक खातेदारांची माहिती काढताना तो बंगलोर येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक देसले व अन्य पोलीस पथकाने बंगलोर येथून प्रशांत शिवामोडीयाला ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. तपासात तो एस. श्रीधर या मुख्य आरोपीसाठी काम करत असल्याचे उघडकीस आले. त्याच्या सांगण्यावरुन त्याने फसवणुकीची रक्कम इतर बँक खात्यात पाठविले होते. एस. श्रीधर हा फरार असल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.