मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मे 2025
मुंबई, – शहरातील एका नामांकित कंपनीचे ईमेल हॅक करुन कंपनीला बोगस मेल पाठवून सुमारे अकरा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी शेरल भास्कर बलय्या या 45 वर्षांच्या आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. शेरल हा कटातील मुख्य आरोपी असून त्यानेच बोगस कंपनीच्या नावाने एका बँकेत करंट खाते उघडले होते, याच बँक खात्यात ही रक्कम जमा होताच एटीएमद्वारे ही रक्कम नंतर काढण्यात आली होती. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी दुजोरा दिला आहे.
यातील तक्रारदारांची एक खाजगी कंपनी असून या कंपनीची एका खाजगी बँकेत करंट अकाऊंट आहे. 19 एप्रिल ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांच्या कंपनीसोबत काम करणार्या एका बोगस कंपनीने त्यांना एक मेल पाठवून पेमेंटसाठी बँक डिटेल्स पाठविले होते. हा मेल खरा समजून त्यांच्या कंपनीने संंबंधित बँक खात्यात अकरा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. पेमेंटनंतर संबंधित कंपनीला पेमेंटविषयी माहिती देण्यात आली होती, यावेळी त्यांना पेमेंट मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. तपासाअंती बोगस कंपनीने त्यांच्या कंपनीचा मेल हॅक करुन त्यांना पेमेंटचा मेल पाठवून ही ऑनलाईन फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे.
हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने तक्रारदारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासात ही रक्कम एका खाजगी कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती, त्यामुळे या कंपनीशी संबंधित माहिती काढण्यात आली होती. त्यात कंपनीचे बँक खाते शेरल बलय्या याच्या नावाने उघडण्यात आले होते.
ही रक्कम जमा होताच काही वेळात एटीएमद्वारे पैसे काढण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर शेरल बलय्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन त्रिमुखे व अन्य पोलीस पथकाने चेंबूर येथून शेरल याला ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात शेरलने एका बँकेत लक्ष्मी इंटरप्रायझेज नावाने बॅक खाते उघडले होते. याच खात्यात तक्रारदाराच्या कंपनीचे अकरा लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम नंतर त्याने एटीएमद्वारे काढली होती. अशा प्रकारे फसवणुक करणार्या टोळीशी त्याचा संबंध उघडकीस आला असून या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले.