दुबईतील सायबर ठगांना बँक पुरविणार्या आरोपीस अटक
निवृत्त कॅप्टनला अकरा कोटीचा गंडा घातल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दुबईहून विविध कारण सांगून ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना विविध बँकेत खाती उघडून देण्यास मदत केल्याप्रकरणी कैफ इब्राहिम मंसुरी नावाच्या एका मुख्य आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ३३ विविध बँकेचे, खातेधारकांचे डेबीट कार्ड, बारा बँकेचे चेकबुक जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने सोमवार २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अलीकडेच कुलाबा येथे राहणार्या एका वयोवृद्ध निवृत्त कॅप्टनला शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे ११ कोटींना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
झकसीस कोसा वाडिया हे वयोवृद्ध तक्रारदार कुलाबा परिसरात राहत असून ते एका खाजगी कंपनीतून जहाजातून कॅष्टन म्हणून निवृत्त झाले आहेत. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून कुठलीही शहानिशा न करता त्यांनी शेअर टे्रडिंगमध्ये ५ सप्टेंबर ते १९ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत ११ कोटी १६ लाख ६१ हजार १६१ रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र कंपनीने मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम न दिल्याने त्यांनी कंपनीत जाऊन चौकशी केली होती. यावेळी त्यांना बोगस ऍपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक करणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या तकारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर नंदकुमार गोपाळे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुरेश भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन त्रिमुखे, पोलीस हवालदार खान, गलांडे यांनी तपासाला सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीवरुन कैफ मंसुरीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
तपासात कैफ हा मोहम्मद अली रोड, नूर पॅलेस इमारतीमध्ये राहतो. तो दुबईतील काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. ही टोळी दुबईत बसून अनेकांना विविध कारण सांगून त्यांची ऑनलाईन फसवणुक करते. या ठगांना त्याने विविध बँकेत खाती उघडून दिले होते. त्याच्या परिचित, त्यांच्या ओळखीतून त्याने काही गरजू आणि गरीब लोकांना पैशांचे आमिष दाखविले होते. त्यांच्या दस्तावेज घेऊन त्याने विविध बँकेत खाती उघडले होते. या बँक खात्याची माहिती तो सायबर ठगांना पुरवत होता. याच बँक खात्यात ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा होत होती. त्यानंतर कैफ ही रक्कम काढून अंगाडियाच्या विदेशी चलन घेऊन दुबईतील सायबर ठगांना पाठवत होता. त्यामोबदल्यात त्याला दहा ते पंधरा टक्के कमिशन मिळत होते. त्याच्याकडून पोलिसांनी ३३ बँकेचे डेबीट आणि बारा बँकेचे चेकबुक सापडले. तक्रारदाराने वेगवेगळ्या २२ बँक खात्यात सुमारे अकरा कोटी रुपये ट्रान्स्फर केली होती.
त्यापैकी एका बँक खात्यात सहा लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम काढण्यासाठी कैफने एका महिलेला बॅकेत पाठविले होते. या महिलेचा शोध घेतल्यानंतर तिच्या चौकशीतून कैफचे नाव समोर आले होते. कैफला ताब्यात घेतल्यानंतर त्याने तो सायबर ठगांसाठी काम करत असल्याचे तसेच त्यांच्यासाठी विविध बॅकेत खाती उघडून देण्यास मदत करत असल्याचे सांगितले. त्याच्या पाच बँक खात्यात फसवणुकीची सुमारे ४४ लाख रुपयांची कॅश जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले. ही रक्कम त्याने सायबर ठगांना दिली होती. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली.