उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकासाठी बोगस वेबसाईट बनवून फसवणुक

कर्नाटक राज्यातून बोगस लिंक बनविणार्‍या मुख्य आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – वाहनांच्या उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकासाठी बोगस वेबसाईट तयार करुन जनतेची फसवणुक करणार्‍या एका मुख्य आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. विनोद व्यकंट बावळे असे या 57 वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्यानेच ही बोगस लिंक बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांतील इतर आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत.

महाराष्ट्र राज्यात वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याने अशा वाहनांमुळे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणार्‍या वाहनांची ओळख पटविणे, नंबर प्लेटमध्ये होणार्‍या छेडछाड आणि बनावटीकरण आदी रोखणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन सर्व वाहनांवर एचएसआरपी बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना एचएसआरी बसविण्यासाठी तीन संस्थाची/उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड करण्यात आली होती. त्यानंतर जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचे काम सुरु झाले होते. त्यासाठी वाहनचालकांना एक अधिकृत वेबसाईटवर त्यांच्या वाहनांची नोंद करणे आवश्यक होते.

मात्र काहीजणांनी बोगस वेबसाईट तयार करुन वाहनचालकांची फसवणुक करत असल्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त गजानन नाना ठोंबरे यांच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार उघडकीस येताच परिवहन विभागाच्या वतीने गजानन ठोंबरे यांनी पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रारीची पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत दक्षिण प्रादेशिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्यासह त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चौधरी, इशान खरोटे, पोलीस हवालदार इक्बाल खान, सचिन वरठे, पोलीस शिपाई नितीन शिंदे आणि महिला पोलीस शिपाई सुनिता गायकवाड यांच्या मदतीने तपास सुरु केला होता. संबंधित बोगस वेबसाईटची तांत्रिक विश्लेषण करुन पोलिसांनी या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना विनोद बावळे या 57 वर्षांच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

चौकशीदरम्यान विनोद हा कर्नाटकच्या बंगलोर, लक्ष्मी व्यकंटेश्वरा, पसिरात राहत असून त्यानेच संबंधित बोगस लिंक तयार केल्याचे उघडकीस आले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करुन त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page