टुरिस्ट व्हिसावर दक्षिण कोरियाला मानवी तस्करीप्रकरण
नौदलाच्या सबलेफ्टनंटसह चौघांना अटक; दोघांना कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जून २०२४
मुंबई, – बोगस कागदत्रांच्या दक्षिण कोरियात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना टुरिस्ट व्हिसा देऊन लाखो रुपये उकाळणार्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर या कटातील चार आरोपींना गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. ब्रम्हा ज्योती, सिमरन तेजी, रवीकुमार आणि दिपक डोगरा अशी या चौघांची नावे असून यातील ब्रम्हा हा नौदलाचा सब लेफ्टनंट असून तोच याच संपूर्ण कटाचा म्होरक्या आहे. अटकेनंतर ब्रम्हा आणि सिमरन यांना किल्ला कोर्टाने ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीर येथून ट्रॉन्झिंट रिमांडवर ताब्यात घेतलेल्या रवीकुमार आणि दिपक यांना सोमवारी मुंबईत पुढील चौकशीसाठी आणले जाणार आहे. या गुन्ह्यांत यापूर्वी बिपीन कुमार डागर याला अटक झाली असून या चौघांच्या अटकेने या कटात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. या कटात इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेला बोगस कागदपत्रांच्या आधारे काही उमेदवारांना दक्षिण कोरियाला टुरिस्ट व्हिसावर पाठविणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या टोळीने टुरिस्ट व्हिसासह इतर बोगस दस्तावेज बनविण्यासाठी संबंधित उमेदवाराकडून दहा ते पंधरा लाख रुपये घेतले होते. तसेच या संपूर्ण कटात काही नौदल अधिकार्यांचा सहभाग असल्याचे समजले होते. या माहितीनंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध फसवणुकीसह भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे देण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तीन दिवसांपूर्वी बिपीनकुमार डागर याला पोलिसांनी अटक केली. बिपीनकुमार हा मूळचा हरियाणाचा रहिवाशी असून त्याने आयएनएस केरळ येथून बी मॅकेनिकलचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो नौदलात रुजू झाला होता. गेल्या सहा वर्षांपासून तो अभियंता विभागात वेस्टर्न नेव्हल कमांडर म्हणून कामाला होता. त्याच्याकडून पोलिसांनी चौदा पासपोर्ट, रबर स्टॅम्प आदी मुद्देमाल जप्त केला होता. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर या पथकाने मुंबईतून ब्रम्हा ज्योती आणि त्याची सहाय्यक म्हणून काम करणार्या सिमरन तेजी या दोघांना अटक केली तर जम्मू-काश्मीर येथे गेलेल्या पथकाने रवी कुमार आणि दिपक डोगरा या दोघांना ताब्यात घेतले होते. अटकेनंतर ब्रम्हा आणि सिमरनला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात ब्रम्ह्य ज्योती हा संपूर्ण कटातील मुख्य आरोपी असून त्याच्यासाठी सिमरन, दिपक आणि बिपीनकुमार हे तिघेही काम करत होते. सिमरने ब्रम्ह्य ज्योतीच्या नावाने बोगस मोबाईल तपशील देऊन बँकेत खाती उघडली होती, याच खात्यात दक्षिण कोरियाला जाणार्या उमेदवाराकडून घेतलेली रक्कम ट्रान्स्फर झाली होती. बीपीनकुमार आणि सिमरन हे दोघेही त्याचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत होते.
या टोळीने काही उमेदवारांचे बोगस दस्तावेज बनवून त्यांना टुरिस्ट व्हिसा देऊन विदेशात पाठविले होते. प्रत्येक उमेदवारामागे त्यांना दहा ते पंधरा लाख रुपये मिळत होते. गेल्या दिड वर्षांपासून ही टोळी कार्यरत होती. दुसरीकडे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या रवीकुमार आणि दिपकला जम्मू-काश्मीरमधील लोकल कोर्टात हजर करुन त्यांची ट्रान्झिंट रिमांड घेण्यात आली होती. कोर्टाने त्यांना ट्रान्झिंट रिमांड मंजूर केल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. सोमवारपर्यंत त्यांना मुंबईत आणून पुन्हा किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. दिपक हा उमेवारांना व्हिसासाठी मदत करत होता तर रवी कुमार लाभार्थी आहे. त्याला बोगस कागदपत्रांच्या मदतीने दक्षिण कोरिया येथे जायचे होते. त्यामुळे तो दिपकच्या संपर्कात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.