मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – पवईतील स्पामध्ये मसाजच्या नावाने चालणार्या सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी असिस्टंट मॅनेजर असलेल्या स्विटी नावाच्या महिलेस अटक केली तर तीन महिलांची सुटका केली. या महिलांची मेडीकलनंतर महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली. या स्पाचा मालक प्रशांत मिस्त्री असून त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले. अटकेनंतर स्विटीला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पवईतील सेंट्रल ऍव्हेन्यू रोड, हिरानंदानी गार्डनजवळील सायप्रेस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर द एलिमेंटस नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये मसाजच्या नावाने तिथे काम करणार्या महिलांना ग्राहकांसोबत वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते अशी माहिती पवई पोलिसांना मिळालीद होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पवई पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याची शहानिशा सुरु केली होती. ठरल्याप्रमाणे हा बोगस ग्राहक स्पामध्ये गेला होता. त्याने तिथे उपस्थित महिलेकडे विशेष ट्रिटमेंटची मागणी केली होती. यावेळी तिने त्याला अतिरिक्त पाच हजार रुपये शुल्क द्यावे लागेल असे सांगितले. त्यांचा होकार येताच तिने त्यांना स्पामध्ये असलेल्या तीनपैकी एका मुलीची निवड करण्यास सांगितले. स्पामध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस येताच ग्राहकाने कॉलद्वारे पोलिसांना इशारा दिला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पारटकर, पोलीस उपनिरीक्षक सरक, पोलीस हवालदार लांडगे, सुभाष खंडागळे, पोलीस शिपाई अहिरे, गायकवाड, महिला पोलीस शिपाई मदवान यांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी स्विटी या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत ती तिथे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होती. स्पाचा मालक प्रशांत मिस्त्री असून त्याने स्विटीसह इतर महिलांच्या मदतीने स्पामध्ये सेक्स रॅकेट सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर स्विटीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली. या तिन्ही महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या गुन्ह्यांत प्रशांत मिस्त्री याला पाहिजे आरोपी आरोपी दाखविण्यात आले असून या दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर स्विटीला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी पाच हजाराची कॅश, एक पेनड्राईव्ह, बँकेचे स्वाईप मशिन, स्कॅनर, स्पाचे रेट कार्डसह मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला आहे.