अंधेरीतील रमशा स्पामध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

स्पाच्या मालकीणीला अटक तर तीन महिलांची सुटका

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 मे 2025
मुंबई, – अंधेरीतील क्रिस्टल प्लाझामधील रमशा स्पामध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी स्पाची मालकीण शोमा सुब्रतो मुखर्जी हिला पोलिसांनी अटक केली असून तिचयाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली असून मेडीकलनंतर या तिन्ही महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चौधरी यांनी सांगितले.

50 वर्षांची शोमा मुखर्जी ही अंधेरीतील वर्सोवा, म्हाडा चार बंगला परिसरात राहते. तिच्या मालकीचे लिंक रोडवरील क्रिस्टल प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर रमशा नावाचे स्पा सेंटर आहेत. या स्पामध्ये काम करणार्‍या महिलांच्या मदतीने ती सेक्स रॅकेट चालविते. तिथे येणार्‍या ग्राहकांसोबत महिला कर्मचार्‍यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करते अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चौधरी यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना सांगितल्यांनतर वरिष्ठांकडून या माहितीची शहानिशा करुन संबंधित स्पाविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशांनतर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याची शहानिशा केली होती.

ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहक स्पामध्ये गेला होता. त्याने शोमा मुखर्जी हिच्याकडे शारीरिक संबंधासाठी महिलेची मागणी केली होती. यावेळी त्यांच्यात स्पामध्ये मसाजसोबत विशेष ट्रिटमेंटसाठी ग्राहकाकडे पाच हजाराची मागणी केली होती. ग्राहकांकडून हिरवा कंदिल मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक वसंत देवकाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चौधरी, पूनम पवार, महिला पोलीस शिपाई गुलाब पलांडे, पोलीस हवालदार प्रविण पाटील यांनी तिथे छापा टाकला होता. या कारवाईत स्पाची मालकीण शोमा मुखर्जीसह इतर तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या महिलेची चौकशी केल्यानंतर शोमा मुखर्जी ही स्पाच्या नावाने तिथे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले. ग्राहकासोबत महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. त्याच्याकडून मिळालेल्या रक्कमेतून काही रक्कम संबंधित महिलांना दिली जात होती, उर्वरित रक्कम ती स्वतजवळ ठेवत होती. हा प्रकार उघडकीस येताच शोमा मुखर्जी हिच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्पामध्ये सुटका करण्यात आलेल्या तिन्ही महिलांची मेडीकल करण्यात आली होती. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या गुन्ह्यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चौधरी हे तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page