साकिनाका येथील स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
स्पाच्या मॅनेजरला अटक तर तीन तरुणींची सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 जून 2025
मुंबई, – साकिनाका परिसरातील एका स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा साकिनाका पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी स्पाचा लवकुश हरेराम राम या 32 वर्षीय मॅनेजरला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमातर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला विशेष कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून मेडीकलनंतर या तिन्ही तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
साकिनाका येथील जरीमरी, अॅरो सिटी सहकारी पार्कच्या आठव्या मजल्यावर सॉलिस्टिक स्काय नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये मसाजच्या नावाने तिथे काम करणार्या तरुणींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जाते. गेल्या काही महिन्यांपासून स्पाचा मॅनेजर तिथे सेक्स रॅकेट चालवतो अशी माहिती साकिनाका पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाला स्पामध्ये पाठवून त्याची शहानिशा करण्याचे आदेश दिले होते.
स्पामध्ये गेलेल्या ग्राहकाने मॅनेजरकडे शरीरसंबंधासाठी एका तरुणीची मागणी केली होती. ही मागणी मान्य करुन त्यांच्यात आर्थिक व्यवहार पक्का झाला होता. त्यानंतर ग्राहकाकडून हिरवा कंदील मिळताच साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी लवकुश राम नावाच्या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली तर स्पामध्ये असलेल्या तीन तरुणींची सुटका केली.
या तरुणींच्या चौकशीतून तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर लवकुशविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर त्याला दुसर्या दिवशी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिन्ही तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.