दुबईतील व्यावसायिकाला अकरा कोटींना गंडा घालणार्‍या चौघांविरुद्ध गुन्हा

एसआरए पुर्नविकास योजनेत गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ मार्च २०२४
मुंबई, – अंधेरीसह जोगेश्‍वरीतील एसआरएच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून दुबईतील एका व्यावसायिकाची चारजणांच्या टोळीने सुमारे ११ कोटीची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध माटुंगा पोलिसांनी भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या आरोपींमध्ये धनजी गाला, अब्दुल अहद वाजिद खान, समीर अब्दुल अहद वाजिद खान आणि सैफ अहद खान यांचा समावेश आहे. या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. गुंतवणुकीसाठी घेतलेल्या अकरा कोटीचा अपहार करुन कुठलाही परवाता न देता व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा या चौघांवर आरोप आहे.

निझर हसम विराणी हे दुबईतील रहिवाशी असून त्यांचा तिथेच प्रॉपटी मॅनेजमेंट करण्याचा व्यवसाय आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत दुबईत राहत असून त्यांचा मुलगा सध्या अमेरिकेत स्वतचा व्यवसाय करतो. अनेकदा ते भारतात आल्यानंतर जुहू येथील सिटीझन हॉटेलमध्ये राहतात. मंसुर हा त्यांचा भाऊ असून त्यांनी त्याच्यासोबत भारतातही रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा व्यवसाय सुरु केला होता. याच दरम्यान त्यांची धनजी गाला याच्याशी ओळख झाली होती. तो माटुंगा येथील भंडारकर रोड, पलाई कॉम्प्लेक्समध्ये राहतो. गेल्या चौदा वर्षांपासून त्याच्या कंपनीत खान कुटुंबिय त्याचे भागीदार होते. २०१० रोजी धनजीने त्याच्या तिन्ही पार्टनर अब्दुल खान, समीर खान आणि सैफ खान यांच्याशी ओळख करुन दिली होती. या ओळखीनंतर त्यांनी अंधेरीतील ओशिवरा, रिलीफ रोडवर आणि जोगेश्‍वरीतील मोकळ्या भूखंडावर एसआरए पुर्नविकास योजनेचे काम हाती घेतल्याचे सांगितले. संबंधित सोसायटीसोबत त्यांच्या कंपनीशी करार झाला होता.

ही जागा डेव्हल्पमेंट करण्यासाठी विविध शासकीय परवानगी घेण्यासाठी, स्थानिक रहिवाशांना भाडे देण्यासाठी तसेच प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी त्यांना तीस कोटी रुपये लागणार होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणुक करावी, त्यामोबदल्यात त्यांना ४५ टक्के पार्टनरशीप देण्याची ऑफर दिली होती. त्यांची ही ऑफर चांगली वाटल्याने त्यांनी त्यांच्यासोबत पार्टनरशीपमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्यात एमओयू झाला होता. त्यात सविस्तर अटी आणि नियम देण्यात आले होते. त्याची हमी स्वत धनजी गाला याने दिली होती. त्यामुळे त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी प्रोजेक्टमध्ये अकरा कोटी रुपयांची गुंतवणुक केली होती. फेब्रुवारी २०१० रोजी ही रक्कम त्यांच्या गजानन बिल्डर्स कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. उर्वरित १९ कोटी रुपये काम सुरु झाल्यानंतर टप्याटप्याने देण्याचे ठरले होते. या मोबदल्यात चारही आरोपी त्यांना ४५ टक्के सेलेबल कन्स्ट्रक्शन एरिया, त्यात कमीत कमी तीन लाख स्न्वेअर फुट जागा देणार होते. तसेच प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर विक्री झालेल्या फ्लॅटतून ते त्यांना गुंतवणुकीची रक्कम परत करणार होते. या दरम्यान ते अधूनमधून भारतात येत होते. संबंधित चौघांची भेट घेऊन ते प्रोजेक्टविषयी माहिती घेत होते. यावेळी त्यांनी काम प्रगतीपथावर असून काही परवानग्या मिळणे बाकी असल्याचे सांगितले होते. काही वर्षांनी ते मुंबईत आल्यानंतर त्यांनी कन्स्ट्रक्शन ठिकाणाची पाहणी केली होती. यावेळी तिथे बांधकाम सुरु असल्याचे तसेच त्यातील बहुतांश बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसून आले.

याच दरम्यान त्यांना गजानन बिल्डर्सने दोनशेहून अधिक फ्लॅटची परस्पर विक्री केल्याची माहिती समजली होती. मात्र या फ्लॅट विक्रीतून त्यांना त्यांचा हिस्सा दिला नव्हता. चौकशीदरम्यान अब्दुल अहद खान, समीर अब्दुल खान आणि सैफ अब्दुल खान यांनी त्यांना विश्‍वासात न घेता दोन अर्थपुरवठा करणार्‍या कंपनीकडून १७५ कोटीचे कर्ज घेतले होते. याबाबत त्यांनी धनजी गालासह इतर तिन्ही आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न केला होता. गुंतवणुकीच्या नावाने त्यांची अकरा कोटीची फसवणुक झाल्याचे उघडकीस येताच त्यांनी चारही आरोपीविरुद्ध माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर धनजी गाला, अब्दुल खान, समीर खान आणि सैफ खान या चारही आरोपींविरुद्ध पोलिसांनी भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page