एसआरए फ्लॅटसाठी घेतलेल्या अठरा लाखांचा अपहार

नऊ महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – एसआरए फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे अठरा लाखांचा अपहार करुन एका महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. इरफान अहमद शकील अहमद शेख असे या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो गेल्या नऊ महिन्यांपासून फरार होता. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्याचा दुसरा सहकारी अमीर अफल खंडवाला याला पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविले असून त्याचा शोध सुरु आहे.

आलिया मंजूर खान ही महिला अंधेरीतील आदर्शनगरात राहत असून एअरपोर्ट येथील एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. तिला एक नवीन फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यामुळे तिने प्रॉपटी एजंट असलेल्या अमीर खंडवाला याच्याकडे फ्लॅटविषयी विचारणा केली होती. यावेळी त्याने तिला विरा देसाई रोडवर एक एसआरएची इमारत असून याच इमारतीमध्ये एक फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत ३५ लाख रुपये असल्यासचे सांगितले होते. हा फ्लॅट पसंद पडल्याने तिने तोच फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. सविस्तर चर्चा केल्यानंतर तिने त्याला अठरा लाख रुपये टप्याटप्याने दिले होते. मात्र तीन महिने उलटूनही त्याने तिला फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. एप्रिल महिन्यांत तिने त्याला जाब विचारला असता त्याने इरफान पटेल याच्या मालकीचे तीन फ्लॅट असून ते तिन्ही फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर दिल्यानंतर तिचे पैसे परत करतो असे आश्‍वासन दिले होते. तोपर्यंत तिने त्याच्या एका फ्लॅटमध्ये राहावे असे सांगून तिच्यासोबत लिव्ह ऍण्ड लायसन्स करार केला होता. काही दिवसांनी तिला तो फ्लॅट इरफान पटेल याच्या मालकीचा नसल्याचे समजले. बोगस करार करुन या दोघांनी तिची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र वांरवार विचारणा करुनही त्याने तिचे अठरा लाख रुपये परत केले नाही.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने इरफान पटेल आणि आमीर खंडवाला या दोघांविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. या दोघांचा शोध सुरु असताना गेल्या नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या इरफान पटेलला अखेर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटातील मुख्य आरोपी अमीर खंडवाला हा फरार असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page