एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या आमिषाने तीस लाखांची फसवणुक
वेस्टर्न रेल्वेच्या ज्युनिअर इंजिनिअरच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जून २०२४
मुंबई, – एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या आमिषाने वेस्टर्न रेल्वेच्या एका ज्युनिअर इंजिनिअरची सुमारे तीस लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सच्छिानंद सुरेश बामणे या आरोपीविरुद्ध अंधेरी पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सच्छिानंद हा ब्लेस्ट प्रॉपटीचा संचालक असून त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांना एसआरए फ्लॅटच्या नावाने गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
४६ वर्षांचे तक्रारदार अमीत केवलदास पेंटर हे लोअर परेल परिसरात राहतात. वेस्टर्न रेल्वेमध्ये ते ज्युनिअर इंजिनिअर म्हणून कामाला आहेत. ते पूर्वी विलेपार्ले येथील रेल्वे वसाहतीत राहत होते. विलेपार्ले येथील कुंकूवाडी परिसरात एक एसआरए इमारतीचे काम सुरु असल्याने त्यांनी तिथे एक फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांची अरुणा भाट आणि हरिष भाट यांच्याची ओळख झाली होती. डिसेंबर २०२१ रोजी अरुणाने त्यांना अंधेरीतील भटवाडी, सुंदरलाल एसआरए इमारतीचा एक व्हिडीओ पाठविला होता. तिचा परिचित सुनिल राऊत हा एसआरएमधये कामाला असून ती त्याला बर्याच वर्षांपासून ओळखते. तोच त्यांना एसआरएचा फ्लॅट लॉटरीमध्ये मिळवून देईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी सुनिल राऊतला संपर्क साधला होता. त्याने सुंदरलाल, भटवाडीचे सर्व कामकाज सच्छिानंद बामणे पाहत असल्याने त्यांची बोलून घेण्यास सांगितले. काही दिवसांनी त्याने त्यांची एसआरए एजंट असलेल्या सच्छिानंद बामणेशी ओळख करुन दिली होती. यावेळी त्याने दहा फ्लॅट दाखवून ते फ्लॅट लॉटरी सिस्टमनुसार मिळतील. प्रत्येक फ्लॅटची किंमत ४० लाख रुपये असून त्यांना बुकींग म्हणून पाच लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. यावेळी त्याने त्यांना लॉटरीमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला पाच लाख रुपये दिले होते.
जानेवारी २०२२ रोजी त्याने त्यांच्या पत्नीच्या नावाने फ्लॅट बुक झाल्याचे सांगून त्यांना फ्लॅटचे लेटर दाखविले होते. एप्रिल २०२२ पर्यंत त्यांना फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगून उर्वरित पैशांची मागणी केली होती. त्याचा आत्मविशास पाहून त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून २५ लाख रुपये दिले होते. मात्र एप्रिलपर्यंत त्याने रुमचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे रुमचे होत नसेल तर रुमसाठी घेतलेले पैसे परत करण्याची अमीत पेंटर यांनी विनंती केली होती. यावेळी सच्छिानंदने त्यांना रुमचे काम होणार आहे, तुम्हाला थांबायचे नसेल तर पैसे परत मिळणार नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा अशी धमकी दिली होती. अशा प्रकारे सच्छिानंद बामणेने लॉटरी सिस्टीमममध्ये अमीत यांना त्यांच्या पत्नीच्या नावे एसआरएचा रुम अलोट झाल्याचे बोगस एसआरएचे लेटर दाखवून त्यांच्याकडून जानेवारी २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत तीस लाख रुपये घेतले, मात्र फ्लॅटचा ताबा किंवा फ्लॅटसाठी दिलेले पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सच्छिानंदविरुद्ध ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.