फ्लॅटसाठी घेतलेल्या ४१ लाखांचा अपहार करुन फसवणुक
वयोवृद्धासह दोघांना गंडा घालणार्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – एसआरए फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ४१ लाख रुपयांचा अपहार करुन एका वयोवृद्धासह दोघांची फसवणुक झाल्याचा प्रकार प्रभादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रशांत वसंत पाटेकर या आरोपीविरुद्घ दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
६७ वर्षाचे तक्रारदार वयोवृद्ध विजय राजाराम चव्हाण हे लालबाग परिसरात राहत असून ते रेल्वेतून निवृत्त झाले आहेत. त्यांना त्यांच्या मुलासाठी मुंबई शहरात एक फ्लॅट विकत घ्यायचा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच प्रयत्नात असताना त्यांची प्रशांत पाटेकरशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्यांना एसआरएचा फ्लॅट ४० लाखांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. मीना संतोष बागवे ही महिला एसआरए फ्लॅटसाठी अपात्र ठरली असून तिला पात्र करुन तिचा फ्लॅट त्यांना स्वस्तात देतो असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यासह लक्ष्मीकांत जाधव यांनाही त्याने अशाच प्रकारे एसआरए फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. डिसेंबर २०१७ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत प्रशांतवर विश्वास ठेवून विजय चव्हाण यांनी १७ लाख तर लक्ष्मीकांत जाधव यांनी त्याला १८ लाख ८० हजार दिले होते.
दोन वर्षांनी त्यांनी या दोघांनाही प्रभादेवीतील एका एसआरए इमारतीचे बांधकाम दाखवून त्यांना त्याच इमारतीमध्ये फ्लॅट मिळणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांना सोळाव्या मजल्यावरील काही फ्लॅट दाखविले होते. त्यानंतर त्याने त्यांच्या उर्वरित पैशांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे या दोघांनी आणखीन पैसे घेतले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्याने एसआरएची पैसे भरल्याची पावती दिली होती. पंधरा दिवसांत फ्लॅटची चावी मिळेल असे सांगून तो निघून गेला. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. एसआरए फ्लॅटसाठी त्याने विजय चव्हाण यांच्याकडून २२ लाख ५० हजार तर लक्ष्मीकांत जाधव यांच्याकडून १८ लाख ८० हजार रुपये घेतले होते, मात्र दिलेल्या मुदतीत फ्लॅट तसेच फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत दिले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून प्रशांत पाटेकर याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. प्रशांतने एसआरए फ्लॅट देतो असे सांगून इतर काही लोकांची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.