एसआरए फ्लॅटच्या नावाने गंडा घालणार्‍या आरोपीस अटक

२२ लाखांच्या अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ डिसेंबर २०२४
मुंबई, – एसआरए फ्लॅटच्या नावाने गंडा घातल्याप्रकरणी संतोष बाबूराव परब या मुख्य आरोपीस चारकोप पोलिसांनी अटक केली. फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे २२ लाखांचा अपहार करुन एका महिलेची फसवणुक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सत्यजीत मनोहर कांबळे, पूजा सत्यजीत कांबळे, शैलेश संतोष कंकण, संतोष कोलते आणि सुधीर असे इतर पाचजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कांताबेन जयंतीलाल भानुशाली ही ४६ वर्षांची महिला कांदिवलीतील चारकोप परिसरात राहते. याच ठिकाणी तिचा पती जयंतीलाल यांच्या मालकीचे मोमाया किराणा जनरल स्टोअर्स आहे. सत्यजीत आणि पूजा ही तिच्या परिचित असून गेल्या दहा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. अनेकदा ते दोघेही तिच्या पतीच्या दुकानातून सामान खरेदी करत होते. सात वर्षांपूर्वी सत्यजीतने तिला कांदविलीतील एम. जी क्रॉस रोड, संत ज्ञानेश्‍वर सहकारी सोसाटीमध्ये एक एसआरएचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट जी कंन्स्ट्रक्शन बिल्डरचा मालकीचा असून तो फ्लॅट तिला २२ लाखांमध्ये देतो असे सांगितले होते. त्यामुळे ती तिच्या पतीसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. तो फ्लॅट तिला आवडला होता. गुंतवणुक म्हणून तिने तो फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. संतोष परब हा बिल्डरचा खास माणूस असल्याने त्यांनी तिला सर्व धनादेश त्याच्याच नावावर देण्यस सांगितले होते.

सत्यजीत आणि पूजावर विश्‍वास ठेवून तिने या दोघांना कॅशमध्ये दहा लाख तर संतोषच्या बँक खात्यात सुमारे बारा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर या दोघांनी शैलेशला फ्लॅटचे कागदपत्रे बनविण्यास दिले होते. तोच बिल्डरच्या एसआरए कागदपत्रे बनवत असल्याने त्यांनी सांगितले होते. फ्लॅटसाठी पूर्ण पेमेंट केल्यानंतर तिला लवकरच फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते. तिचा विश्‍वास बसावा म्हणून त्यांनी तिला एसआरए फ्लॅटचे काही दस्तावेज दिले होते. जून २०१८ रोजी त्यांनी तिला फ्लॅटचा ताबा दिला होता. त्यामुळे तिने स्वतचे कुलूप लावून फ्लॅट बंद करुन ठेवला होता. दोन महिन्यानंतर सुधीर नावाच्या एका व्यक्तीने तिच्या पतीला फोन करुन फ्लॅट खाली करण्यास सांगितले. एसआरएकडून अद्याप फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही.

जोपर्यंत एसआरएकडून पजेशन लेटर मिळत नाही तोपर्यत त्यांना तिथे राहता येणार नाही. त्यामुळे तिने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला. मात्र पाच वर्ष उलटूनही त्यांनी तिला पजेशन लेटर दिले नाही किंवा फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. विचारणा केल्यानंतर सत्यजीत आणि पूजा हे दोघेही तिला दम देत होते. सतत विचारणा केल्यास तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत होते. या प्रकाराने कांताबेन भानुशाली हिला धक्काच बसला होत. त्यामुळे तिने त्यांनी दिलेल्या फ्लॅटच्या कागदपत्रांची शहानिशा केली होती. त्यात त्यांनी दिलेले सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले. याबाब विचारणा केल्यानंतर त्यांनी फ्लॅट देणार नाही किंवा पैसे परत करणार नाही असे सांगून तिला काय करायचे ते कर अशी धमकी दिली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने चारकोप पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी सत्यजीत, त्याची पत्नी पूजा, इतर सहकारी शैलेश, संतोष आणि संतोष परब यांच्याविरुद्ध एसआरए फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे २२ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना पळून गेलेल्या संतोष परबला सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतरांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने एसआरए फ्लॅटच्या नावाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page