स्वस्तात एसआरएचा फ्लॅट देण्याच्या आमिषाने फसवणुक
पंधरा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – जोगेश्वरीतील मसाजवाडी, स्वप्नपूर्ती या एसआरए सहकारी सोसायटीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची दोन भामट्यांनी सुमारे पंधरा लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी या दोन्ही भामट्याविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वैभव बाबूभाई क्षीरसागर आणि गोवर्धन वाय सालियन अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून या चौकशीनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.
परेश नानजी गाला हे जोगेश्वरी येथे राहत असून एका खाजगी कंपनीत सेल्समन म्हणून कामाला आहे. त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांची त्याच परिसरात राहणारा आणि दलालीचे काम करणार्या वैभव क्षीरसागरशी ओळख झाली होती. त्यांनी त्याला वन रुम किचन फ्लॅटबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांना जोगेश्वरीतील मसाजवाडी, स्वप्नपूर्ती सहकारी सोसायटीचा एक फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट एसआरएच्या पीएपी या वर्गीकरणमधला होता. त्याची एसआरएमध्ये चांगली ओळख असून काही अधिकार्यांशी सेटिंग करुन त्यांना स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी फ्लॅटचा व्यवहार सुरु केला होता. यावेळी त्याने त्यांना 35 लाखांमध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
काही दिवसांनी वैभवने त्यांची ओळख गोवर्धनशी करुन दिली. गोवर्धन हाच त्यांना फ्लॅट मिळवून देईल असेही त्याने त्यांना सांगितले होते. या दोघांवर विश्वास ठेवून त्यांनी फ्लॅटसाठी त्यांना 15 लाख 30 हजार रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांनी त्यांना फ्लॅटचे अलॉटमेंट लेटर दिले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही, फ्लॅटचे दस्तावेज दिले नाही. वारंवार विचारणा करुनही ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा नाद सोडून त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी त्याला दिड लाखांचा धनादेश दिला,
मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला. सतत कॉल करुनही त्यांनी पैसे परत केले नाही. या दोघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वैभव क्षीरसागर आणि गोवर्धन सालियन या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील वैभव हा जोगेश्वरी तर गोवर्धन मिरारोड येथे राहतो. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. एसआरएच्या फ्लॅटच्या नावाने त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.