एसआरए रुमच्या नावाने गंडा घालणार्या भामट्याला अटक
दोन फ्लॅटसाठी तीस लाख रुपये घेऊन व्यावसायिकाची फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – गेल्या अकरा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या एसआरए रुमच्या नावाने गंडा घालणार्या एका भामट्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. तबीश मोहम्मद वसे बट असे या आरोपीचे नाव असून त्याने मुबीन के खान याच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे तबीशसह मुबीनला या गुन्ह्यांत सहआरोपी करण्यात आले होते. अटकेनंतर तबीशला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी पळून गेले होते. अखेर अकरा महिन्यानंतर तबीश बटला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मोहम्मद शाहिद इलियास खान हे अंधेरीतील मिल्लतनगर परिसरात राहत असून त्यांच्या मालकीचे सानू नावाचे एक मेडीकल आणि जनरल स्टोर आहे. त्यांचा मुलगा मोहम्मद आरिफचे जोगेश्वरीतील बेहरामबाग, मातेश्वरी सहकारी सोसायटीच्या एसआरएमध्ये रुम अपत्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी रुम पात्र करण्यासाठी त्यांच्या परिचित सचिन देसाई यांची मदत मागितली होती. यावेळी त्याने त्यांची ओळख मुबीनशी करुन दिली होती. मुबीनची एसआरएमध्ये चांगली ओळख असून तोच त्यांच्या मुलाचा रुम पात्र करुन देईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी मुबीनची भेट घेऊन त्याला रुमचे सर्व दस्तावेज दिले होते. ठरल्याप्रमाणे मुबीनने त्याचा रुम पात्र करुन दिल्याने त्यांना त्याच्यावर विश्वास बसला होता. मोहम्मद शाहिद यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात तिला एक रुम द्यायचा होता, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याबाबत त्याने मुबीनशी चर्चा केली होती.
मुबीनने त्यांची तबीश बटशी ओळख करुन दिली होती. तोच त्यांना एसआरएचा एक नाहीतर दोन रुम स्वस्तात मिळवून देईल असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांची तबीशशी भेट घडवून आणली. यावेळी त्याने त्यांना मातेश्वरी सहकारी सोसायटीमध्ये त्यांना दोन फ्लॅट प्रत्येकी 25 लाखांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी त्यांना दोन्ही फ्लॅट दाखविले होते. त्यामुळे त्यांनी त्याला दोन लाख रुपये दिले होते. काही दिवसांनी या दोघांनी मोहम्मद शाहिद यांना कॉल करुन त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावाने फ्लॅटचे अॅनेष्चर मिळाले असून त्यासाठी त्यांना तातडीने पैसे भरावे लागतील असे सांगितले. जानेवारी 2023 रोजी गोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी तबीश आणि मुबीन यांना 28 लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. त्यानंतर त्यांच्यात एक सामंजस्य करार झाला होता. या कराराची त्यांनी नोटरी केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी एसआरए फ्लॅटचे दस्तावेज दिले नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी एसआरएमध्ये चौकशी केली होती. यावेळी तबीश आणि मुबीन यांनी त्यांना एसआरएच्या दोन्ही फ्लॅटचे दिलेले दस्तावेज बोगस असल्याचे समजले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांना जाब विचारुन रुमसाठी घेतलेल्या 30 लाखांची मागणी सुरु केली होती. त्यांनीही त्यांची चूक कबुल करुन त्यांना पैसे देण्याचे आश्वासन दिले, काही दिवसांनी त्यांनी त्यांना 40 लाखांचा धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. याबाबत विचारणा केल्यानंतर या दोघांनी त्यांना पैसे देणार नाही असे सांगून पुन्हा पैशांची मागणी करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
अशा प्रकारे तबीश आणि मुबीनने दुसर्या व्यक्तींचे रुम दाखवून त्यांना ते रुम स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून त्यांची 30 लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी गोरेगाव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तबीश आणि मुबीन या दोघांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन तीस लाखांचा अपहार करुन फसवणुक करणे, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे आदी भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु होता.
याच गुन्ह्यांत तबीश बट हा गेल्या अठरा महिन्यांपासून फरार होता. त्याचा शोध सुरु असताना त्याला गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने मुबीनच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला अटक करुन शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची रुमच्या नावाने फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.