धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी हिंदू देवतांचे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल
मध्यप्रदेशातून पदवीधर तरुणाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मे 2025
मुंबई, – सोशल मिडीयावर हिंदू देवतांचे आक्षेपार्ह आणि अश्लील फोटोसह पोस्ट व्हायरल करुन दोन समाजात धार्मित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका पदवीधर पदवीधर तरुणाला मध्यप्रदेशातून महाराष्ट्र राज्य सायबर सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीने विविध सोशल साईटवर संबंधित आक्षेपार्ह आणि अश्लील पोस्ट व्हायरल करुन सोशल मिडीयावर बोगस अकाऊंट उघडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग आहे का याचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे.
गेल्या काही दिवसांत सोशल मिडीयावर हिंदू देवतांचे आक्षेपार्ह आणि अश्लील फोटोसह पोस्ट व्हायरल झाली होती. संबंधित फोटोसह व्हिडीओ ट्विटर, फेसबुक, ऑनलाईन बाजारपेठा आणि अश्लील वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्याची राज्य सायबर सेल विभागात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध 196, 294, 299 भारतीय न्याय सहिता आणि 67, 67 अ आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला होता.
तपासात संबंधित पोस्ट मध्यप्रदेशातील इंदोर शहरातून व्हायरल झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सायबर सेलचे एक पथक तिथे पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका पदवीधर तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्यानेच सोशल मिडीयावर हिंदू देवतांचे आक्षेपार्ह आणि अश्लील पोस्ट व्हायरल केल्याची कबुली दिली होती. आरोपी मध्यप्रदेशच्या इंदोर शहराचा रहिवाशी असून त्याचे बी कॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या तो सीएचा अभ्यास करतो. बोगस ट्विटर प्रोफाईलच्या माध्यमातून त्याने हिंदू देवींचे अत्यंत आक्षेपार्ह डिजीटल सामग्रीचे प्रसारण केले होते.
दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करुन धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक असंतोष निर्माण करणे यामागील त्याचा उद्देश होता. त्याच्या मोबाईल जप्त करुन तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला होता. त्यात त्याच्या मोबाईल डिवाईसवरुन सहा ट्विटर खात्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. या सहा अकाऊंटवरुन त्याने हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील मॅसेजसह फोटो व्हायरल केले होते.
या संपूर्ण प्रकरणात आरोपीशी संबंधित् सात परस्पर ट्विटर खाते आढळून आले असून बोगस माहिती टाकून संबंधित खाते उघडण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यत आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवार 13 मेपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित पोस्ट त्याने कोणाच्या सांगण्यावरुन अपलोड केले होते, याकामी त्याला कोणी मदत केली होती, त्यात काही आर्थिक व्यवहार झाले होते का याचा पोलीस तपास करत आहेत.