मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मार्च 2025
मुंबई, – सुमारे सव्वादोन कोटीच्या स्टिल मटेरियलच्या पेमेंटचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुर्तीजा योसुफ आणि शिरीन योसुफ शाकरी या दोन व्यावसायिकाविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी फसवुणकीचा गुन्हा दाखल केला असून ते दोघेही कोलकाताचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिलीप मधुकर दलाल हे स्टिल व्यावसायिक असून डोबिवली परिसरात राहतात. त्यांची फोरटन स्टिल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून या कंपनीचे कार्यालय घाटकोपर येथील एम. जी रोड, सत्यम शॉपिंग सेंटरमध्ये आहे. याच कार्यालयातून त्यांचा सर्व व्यवहार चालतो. मुर्तिजा योसुफ आणि शिरीन शाकरी हे त्यांच्या परिचित स्टिल व्यावसायिक आहेत. ते दोघेही मूळचे कोलकाताचे रहिवाशी असून त्यांच्या मालकीची जग्रोस हार्डवेअर ट्रेडिंग नावाची एक कंपनी आहे. याच कंपनीचे ते दोघेही मालक आहेत. या दोघांनी त्यांना कमी किंमतीत स्टिल मटेरियल देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना मे 2024 रोजी 21 लाख 77 हजार 714, जून 2024 रोजी 32 लाख 89 हजार 291 तसेच ऑगस्ट 2024 रोजी 36 लाख 7 हजार 708 रुपयांचे स्टिल मटेरियल पुरवठा करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यांचा व्यवहार आवडल्याने त्यांनी त्यांना एक हजार टन स्टिल मटेरियलसाठी 3 कोटी 2 लाख 51 हजार 502 रुपयांचे पेमेंट केले होते.
ही रक्कम त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. त्यापैकी त्यांनी त्यांना 79 लाख 67 हजार रुपयांचा माल पाठविला. मात्र उर्वरित सव्वादोन कोटीचा स्टिल मटेरियल न पाठविता किंवा दिलेले पेमेंट परत न करता त्यांची फसवणुक केली होती. वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. या दोघांकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी दोन्ही आरोपी व्यावसायिकाविरुद्ध टिळकनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मुर्तिजा योसुफ आणि शिरीन शाकरी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.