स्टॉक मार्केट गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणुक
सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ जुलै २०२४
मुंबई, – स्टॉक मार्केट गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी सत्यप्रकाश अतुलकुमार राऊत या आरोपीस पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीसाठी सत्यप्रकाशने सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप असून त्याच्या अन्य सहकार्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.
५९ वर्षांचे नवीन लखमशी शहा हे त्यांच्या पत्नीसोबत विलेपार्ले परिसरात राहत असून झव्हेरी बाजार येथील फॅशन ज्वेलरीमध्ये कामाला आहेत. डिसेंबर २०२३ रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने एका ग्रुपमध्ये ऍड केले होते. या ग्रुपमध्ये १४२ सभासद होते, त्यात ऍडमिन नियमित स्टॉक मार्केट ट्रेडिंगबाबत माहिती देत होते. जवळपास एक महिना ते ग्रुपमधील सर्व मॅसेज पाहत होते. त्यानंतर त्यांनी ग्रुपच्या ऍडमिशनशी संपर्क साधून त्यांना स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल अशा योजना सांगण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांना एक लिंक पाठवून अकाऊंट ओपनसह रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात आलेह ोते. त्यामुळे त्यांच्या नावाने अकाऊंट ओपन करुन रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर त्यांनी स्टॉक मार्केट गुंतवणुकीसाठी विविध खात्यात सुमारे अकरा लाख रुपये जमा केले होते. या गुंतवणुकीवर त्यांना सुमारे सोळा लाख रुपये प्राफिट झाल्याचे दिसून आले. ही रक्कम त्यांनी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती रक्कम खात्यात ट्रान्स्फर झाली नाही. त्यामुळे त्यांनी ग्रुप ऍडमिनकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांना पैसे ट्रान्स्फर करु नका, नाहीतर तुम्हाला प्रचंड नुकसान होईल. तसेच पैसे काढल्यास त्यांना टॅक्स भरावा लागेल असे सांगितले. त्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. ग्रुपमधील अनेक सभासदांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा झाल्याचे दिसून येत होते, मात्र त्यांना ती रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर करता येत नाही. त्यांनाही ग्रॅुप ऍडमिनकडून विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न केला जात होता.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगांविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ भादवीसह ६६ सी, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकी एक बँक खाते सत्यप्रकाश राऊत याचे होते, त्यामुळे त्याचा शोध घेऊन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने फसवणुक करणार्या सायबर ठगांना काही बँक खाती पुरविल्याचे उघडकीस आले. याच बँक खात्यात ही रक्कम जमा होती. त्यातील काही रक्कम त्याला कमिशन म्हणून देण्यात आली तर उर्वरित रक्कम त्याने संबंधित सायबर ठगांना पाठविली होती. तपासात हा प्रकार उघडकीस येताच सत्यप्रकाशला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.