खाकी वर्दीतील प्राणीप्रेमी माणुसकी

0

 

पोलीस म्हटले की, खाकी वर्दीतील निर्दयी माणूस अशीच सर्वसामान्यांची समजूत असते. गुन्हेगारांसोबत राहून पोलीस कठोर, निर्दयी बनतात. त्यांना कोणाच्या भावनांशी काहीही संबंध नसतो. त्यांना प्रत्येक व्यक्ती ही गुन्हेगारच वाटत असते, असे एक ना हजार निष्कर्ष काढले जातात. पण या खाकी वर्दीच्या आत एक भावनाशील, प्रेमळ, सद्गदित होणारा माणूस असतो. तो माणसांचेच नव्हे तर प्राण्यांचेही दुख जाणतो, याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. बोरिवली पश्चिम येथील एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर कुडाळकर. कुडाळकर यांचे प्राणीप्रेम बघून त्यांच्या परिचितांना कधी कधी प्रश्न पडतो की ही व्यक्ती नक्की एक पोलीस अधिकारी आहे का? कारण कुडाळकर आपल्या मनात पोलिसांबद्दल असलेल्या सर्व समजुतींना छेद देतात. त्यांच्या वर्तनातून डोकावणारा एक प्राणीप्रेम आपल्याला आश्चर्यचकीत केल्याशिवाय रहात नाही.
कुडाळकर ज्या एमएचबी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत तेथील नागरिकांना त्यांच्या माणुसकीचे वारंवार दर्शन घडत असते. गुन्हेगारांबद्दल कठोर वागणारे कुडाळकर आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भटक्या कुत्र्यांची तितक्याच मायाळूपणाने देखभाल करतात. ते कधी गस्तीवर निघाले की या मुक्या प्राणांना कसे कळते माहित नाही. पण त्यांची वरात कुडाळकर यांच्या गाडीच्या आजूबाजुला असते. त्यांना माहित असते की आपल्या हक्काचा माणूस आला आहे. कुडाळकरही त्यांना कधीच निराश करत नाही. गस्तीवर असताना त्यांच्यासोबत पाण्याची बाटली, अन्न आणि एक वाडगं असते. हे भटके कुत्रे एकत्र जमले की, कुडाळकरांकडून पाहुणचार घेऊन ते तृप्त होतात. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केल्यानंतर कुडाळकर यांच्या चेहऱ्यावर चमकणारा आनंद अनेकांना समाधान देणारा असतो.

कुडाळकरांच्या पाळीव प्राणांच्या कुटुंबात नुकतेच एका मांजरीचा समावेश झाला आहे. ही मांजर सुमारे १५ दिवस बेपत्ता होती. त्यामुळे अर्थातच कुडाळकरांना चैन पडत नव्हती. मात्र ती परत आल्यावर कुडाळकर यांनी आशा प्रकारे आपले प्राणी बेपत्ता होऊ नये म्हणून एक अभिनव योजना काढली. त्यांनी या मांजरीच्या गळ्यात क्यूआर कोड असलेली काॅलर बांधली. त्यामुळे मांजर नेमकी कुठे आहे याचा पत्ता कुडाळकर यांना लागतो. अशा प्रकारे आपल्या पाळीव प्राणांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने कुडाळकर काळजी घेत असतात.
खरं म्हणजे खाकी वर्दीतल्या माणसाला प्राणांबद्दल इतके प्रेम कसे, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण म्हणतात ना की माणसांचा अंतरआत्मा जागृत झाला की त्याला प्रत्येक गोष्टीत परमेश्वर दिसत असतो. एका अशाच प्रसंगातून कुडाळकर यांना साक्षात्कार झाला. त्यांच्या पत्नीलाही प्राणांची आवड आहे. एका व्यक्तीकडे एक पर्शियन मांजर होती. मात्र ती व्यक्ती त्या मांजराचा छळ करायची. कुडाळकर यांच्या पत्नीला ते समजले तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीकडून त्या मांजराची सुटका केली. त्या मांजराची देखभाल केली. हे सगळं पहात, अनुभवत असताना कुडाळकर यांना प्राण्यांचा लळा लागला. आज हे मुके प्राणी कुडाळकर यांची दुसरी रमणीय दुनिया आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. त्यानंतर कुडाळकर यांच्या मनात या मुक्या प्राण्यांबद्दल प्रेमाचा अंकुर जो फुटला त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. त्यांना जणू परमेश्वरच गवसला आहे.
करोनाच्या काळात माणसांचे किती हाल झाले हे आपण पाहिले. त्याच त्या काळातही पोलीस आपली ड्युटी निभावत होते. माणसांना जेथे बघण्यास यंत्रणा हतबल ठरत होती तेथे प्राण्यांचे काय? पण कुडाळकर यांनी त्या काळातही जेथे, जसे जमले तसे प्राण्यांची काळजी घेतली. त्यांना अन्न, पाणी मिळले याची सोय केली. त्याच काळात कुडाळकर यांनी १५० वर्षे वयाच्या कासवाची सुटका केली. त्यांच्या या कार्याचा गौरव प्राणीमित्र संघटना पेटा, एडब्ल्यूबी, पोलीस खाते आणि महाराष्ट्र सरकारनेही गौरव केला.
खाकी वर्दीत वावरताना माणूसच नव्हे तर प्राणांबद्दल कुडाळकर यांचे प्रेम निस्सीम आहे. गुन्हेगारांबद्दल कठोर वागताना कुडाळकर यांनी आपल्यातील माणूस मरू दिलेला नाही. उलट प्राणीप्रेमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मधील माणुसकीला खतपाणी घातले. अशी मुलखावेगळी माणसे समाजात अभावानेच पहायला मिळतात. पण जी असतात ती आपल्यातून इतरांना प्रेरणा देत असतात. कुडाळकर हेही त्यांच्या प्राणीप्रेमातून अनेकांसाठी प्रेरणास्रोत बनले आहे हे निश्चित.

आबा माळकर

 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page