मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून महिलेची आत्महत्या
आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 नोव्हेंबर 2025
मुंबई, – क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन होणार्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून सपना गौतम त्रिभुवन या 36 वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकणी सपनाचा पती गौतम भागीनाथ त्रिभुवन याला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पत्नीचा मानसिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना सोमवारी 17 नोव्हेंबरला दुपारी बारा ते एकच्या दरम्यान दहिसर येथील नवागा, पाठारेवाडी, राजाराम पाटील चाळीत घडली. संगीता अशोक म्हस्के ही 54 वर्षांची महिला मूळची जालन्याच्या अंबड, जामखेडची रहिवाशी असून गेल्या पाच वर्षांपासून नाशिकच्या शिवाजीनगर, सातपूर येथे राहते. याच परिसरात असलेल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ती कामाला आहे. सपना ही तिची मुलगी असून नोव्हेंबर 2007 साली तिचे गौतमशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच गौतम हा तिचा क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन मानसिक व शारीरिक शोषण करत होता. तिला सतत शिवीगाळ करुन मारहाण करत होता.
याबाबत सपनाने तिची आई संगीताला अनेकदा माहिती दिली होती. सततच्या छळाला कंटाळून सपना ही 2021 रोजी तिच्या दोन्ही मुलांसोबत माहेरी निघून आली होती. यावेळी गौतम एकदाही तिला भेटायला आला नाही. उलट तो तिला मोबाईलवरुन शिवीगाळ करुन धमकी देत होता. या धमकीनंतर सपनाने तिच्या पतीविरुद्ध कोर्टात दावा करुन एक याचिका सादर केली होती. मे 2025 रोजी गौतमच्या सांगण्यावरुन त्यांच्यात एक समझौता झाला होता. त्यामुळे तिनेही भविष्याचा विचार करुन दोन्ही मुलांसह गौतमसोबत दहिसर येथील घरी आली होती. काही दिवस चांगले गेले,
मात्र नंतर गौतम पुन्हा तिचा क्षुल्लक कारणावरुन मानसिक व शारीरिक शोषण करु लागला होता. याच दरम्यान तिला गौतमचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समजली होती. याबाबत तिने त्याला जाब विचारला असता त्याने तिला सोडण्यास नकार दिला. तिला घरातून निघून जाण्यास किंवा जीव देण्याचा सल्ला दिला होता. या घटनेनंतर सपना ही प्रचंड मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या मानसिक नैराश्यातून सोमवारी 17 नोव्हेंबरला तिने तिच्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
ही माहिती समजताच संगीता म्हस्के ही तिच्या मुलगा आणि सूनेसोबत मुंबईत आली होती. भगवती हॉस्पिटलमध्ये तिला सपनाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजले. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी संगीता म्हस्के हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात तिने सपनाचा तिच्या पतीकडून होणार्या मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. त्याचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते.
पतीकडून होणार्या शिवीगाळ, मारहाणीसह छळाला कंटाळूनच सपनाने आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येला गौतम हाच जबाबदार असल्याचा आरोप करुन तिने त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गौतमविरुद्ध पत्नीचा छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.