पैशांसाठी होणार्या छळाला कंटाळून विवाहीत महिलेची आत्महत्या
एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल तर पतीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – फ्लॅटसह दैनदिन गरजेसाठी पैशांच्या होणार्या मागणीमुळे मानसिक नैराश्यातून वैष्णवी गोरक्षनाथ भोजणे या विवाहीत महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका कुटुंबातील चौघांविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोरक्षनाथ भगवान भोजने, भगवान दिनभाऊ भोजणे, मंदा भगवान भोजणे आणि स्नेहा भगवान भोजणे अशी या चौघांची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच आरोपी पती गोरक्षनाथला पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कविता रामदास बुळे ही महिला पुण्याच्या आंबेगावातील खडकी-पिंपळगावची रहिवाशी असून तिथे ती तिच्या पती रामदास आणि मुलगा सिद्धेशसोबत राहते. बुळे कुटुंबिय शेती करत असून त्यातुन मिळणार्या उत्पनावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. तिला वैष्णवी नावाची एक मुलगी असून तिचे डिसेंबर २०२२ रोजी गोरक्षनाथ भोजणे याच्यासोबत पुण्यात लग्न झाले होते. लग्नानंतर वैष्णवी ही तिच्या विक्रोळीतील सासरी निघून गेली होती. मात्र लग्नानंतर काही दिवसांत तिचा पती गोरक्षनाथ, सासरे भगवान, सासू मंदा आणि नणंद स्नेहा हे चौघेही नवीन फ्लॅटसह दैनदिन गरजा भागविण्यासाठी तिने माहेरहून पैसे आणावेत म्हणून तिचा मानसिक व शारीरिक शोषण करत होते. लग्नानंतर ती तिच्या घरी आल्यानंतर तिच्या आईला हा प्रकार सांगितला होता. त्यामुळे कविता बुळे यांनी त्यांना फोनवरुन त्यांचे कर्ज फेडल्यानंतर त्यांना घरासाठी कर्ज काढून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते तरीही सासरच्या मंडळीकडून तिचा सतत मानसिक शोषण सुरु होता. ती गरोदर राहिल्यानंतर बाळाचे हृदयाचे ठोके कमी असल्याने तिच्या पतीने तिला जबदसतीने गर्भपात करण्यास प्रवृत्त केले होते. त्याचा तिला प्रचंड त्रास झाला होता. त्यानंतर ती तिच्या माहेरी आली नाही. फ्लॅटसह दैनदिन खर्चासाठी सासरे मंडळीकडून होणार्या मानसिक व शारीरिक ती प्रचंड कंटाळून गेली होती. त्यातून तिला प्रचंड नैराश्य आले होते. त्यामुळे तिने रविवारी २१ एप्रिलला आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
हा प्रकार लक्षात येताच भोजने कुटुंबियांनी तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच बुळे कुटुंबिय मुंबईत आले होते. या घटनेनंतर कविता बुळे यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत तिने तिच्या मुलीचा पैशांसाठी सासरच्या मंडळीनी मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर पोलिसांनी वैष्णवीचा पती गोरक्षनाथ, सासरे भगवान, सासू मंदा आणि ननंद स्नेहा यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषण करुन तिचा गर्भपात करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पती गोरक्षनाथ भोजणे याला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.