मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 एपिल 2025
मुंबई, – दैनिक जन्मभूमीमध्ये गेल्या साडेतीन दशकापासून वरिष्ठ क्राईम रिपोर्टर म्हणून काम करणारे सुरेंद्र मोदी यांचे सोमवारी सकाळी अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मरिनड्राईव्ह येथील चंदनवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
सुरेंद्र मोदी हे गुजरातीतील आघाडीचे दैनिक जन्मभूमीमध्ये गेल्या साडेतीन दशकापासून क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत होते.क्राईम रिपोटींग क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतला जात होता. अचूक, निर्भीड आणि अभ्यासपूर्ण पत्रकारितेमुळे त्यांनी स्वतची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. क्राईम रिपोटींग करणार्या नवख्या पत्रकारांना ते मोल्याचे मार्गदर्शन करत होते. त्यांच्या रिपोटींग शैलीमुळे अनेकांमध्ये ते काही दिवसांत लोकप्रिय झाले होते. मुंबई क्राईम रिपोर्टर असोशिएशनच्या उपाध्याय तसेच गुजराती पत्रकार संघाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले होते. संघटनेच्या प्रत्येक कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
अत्यंत मनमिळावू स्वभावासह लोकांना मदत करण्यात ते नेहमी अग्रेसर राहत होते. त्यांच्या अडअणींना समजावून त्या सोडविण्यावर त्यांचा अधिक भर राहत होता. सध्या ते दक्षिण मुंबईतील लोहार चाळीतील मुस्तका महल इमारतीच्या पाचव्या मजल्यावर एकटेच राहत होते. ते अविवाहीत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांना फारसे कोणालाही भेटता येत नव्हते. तरीही तो फोनवरुन अनेकांच्या संपर्कात राहून पोलीस मुख्यालयात घडणार्या घडामोडींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते.
सोमवारी सकाळी अपघातात ते जखमी झाले होते. त्यांना जी. टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला होता. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली वाहिली होती. त्यांच्या पश्वत त्यांचा एक भाऊ आहे.