सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस
मुंबई पोलिसानंतर सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मार्च 2025
मुंबई, – सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या नसून आत्महत्या केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. अलीकडेच सेशन कोर्टात सीबीआयने एक क्लोजर रिपोर्ट सादर केला असून त्यात सुशांतने आत्महत्या केली असून त्यामागे घातपात नसल्याचे नमूद केले आहे. याच रिपोर्टमध्ये त्याची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबियांना क्लिन चीट देण्यात आली आहे. पाच वर्षांनी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केल्याने या गुन्ह्यांचा तपास आता बंद झाला आहे.
सुशांत हा वांद्रे येथील माऊंट ब्लॅक अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर राहत होता. याच फ्लॅटमध्ये 14 जून 2020 रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनास्थळीचा पंचनामा केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. तिथेच तीन डॉक्टरांच्या विशेष पथकाने शवविच्छेदन केले होते, प्राथमिक अहवालात सुशांतची आत्महत्या असल्याचे उघड झाले होते, मात्र अंतिम अहवालाची पोलीस प्रतिक्षा करीत होते, अखेर त्याचा अंतिम अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात डॉक्टरांनी सुशांतने आत्महत्या केल्याचे नमूद केले होते. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यापूर्वी सुशांतच्या अवयवाचे काही भाग कालिना येथील फॉरेन्सिक लॅबमधये पाठविले होते,
आत्महत्येपूर्वी त्याने मद्यप्राशन किंवा ड्रग्जचे सेवन केले होते याचा पोलिसांकडून तपास करण्यात आला होता. त्यासाठी फिजिक्स आणि टॉक्सीकोलॉजी विभागाचे काही तंज्ञ अधिकार्याचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. सुशांतच्या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नव्हते. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी 25 हून अधिक जणांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. त्यात त्याच्या कुटुंबातील सदस्यासह प्रेयसी, मॅनेजर, मित्र तसेच नोकरांचा समावेश आहे. या सर्वांनी सुशांतच्या आत्महत्येमागे ठोस काहीही सांगितले नाही, मात्र सर्वांच्या जबानीतून सुशांत हा मानसिक तणावात होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आहे.
याच दरम्यान सुशांतच्या वडिलांनी पटणा येथे सुशांतची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करुन तपास करण्याची विनंती केली होती. त्याचा तपास नंतर सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. त्यामुळे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा सीबीआयने नव्याने चौकशी सुरु केली होती. गुन्ह्यांच्या तपासाचे कागदपत्रे वांद्रे पोलिसांकडून घेतले होते. काही लोकाचीं पुन्हा चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. मात्र त्यांच्या चौकशीतून सुशांतची हत्या झाल्याचे काहीही पुरावे पोलिसांना सापडले नव्हते. सुशांत हा मानसिक तणावात होता, त्यातून नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे सीबीआयच्या तपासातून उघडकीस आले होते. त्यामुळे पाच वर्षांनी सीबीआयने विशेष सेशन कोर्टात त्यांचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. त्यात त्यांनी सुशांतने आत्महत्या केली असून त्याची हत्या झाली नाही. त्याला कोणीही आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नव्हते.
या घटनेमागे घातपात नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबियांचा काहीही संबंध नाही, त्यामुळे या गुन्ह्यांत रियासह तिच्या कुटुंबियांना क्लिन चीट देण्यात आली होती. या क्लोजर रिपोर्टमध्ये एम्सच्या फॉरेन्सिक टिमचा अहवाल सादर करण्यात आला असून या टिमनेही सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. सुशांतच्या सोशल मिडीयाचे चॅट विदेशात पाठविण्यात आले होते. त्यातही काही फेरफार करण्यात आले नव्हते असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.