मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ डिसेंबर २०२४
मुंबई, – खुर्च्यासाठी दिलेल्या पेमेंट अपहार करुन एका खाजगी कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी जावेद बुनदू खान या ३२ वर्षांच्या दिल्लीतील व्यावसायिकाला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. जावेद हा ए टू झेड कंपनीचा मालक असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड होता. अखेर त्याला दिल्लीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रविण हिराकांत धेनक हे मुंब्रा येथे राहत असून एका खाजगी कंपनीत लायजिंग अधिकारी म्हणून काम करतात. १० मे २०२१ रोजी या कंपनीने दिल्लीतील ए टू झेड कंपनीला २५० खुर्च्याचे ऑर्डर दिली होती. या कंपनीचा मालक जावेद खान आहे. एका खुर्चीची किंमत २३२० रुपये होती, जीएसटी मिळून त्यांना संबंधित कंपनीला ६ लाख ८४ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यामुळे कंपनीच्या बँक खात्यात ३ लाख ८७ हजार ७८७ रुपयांचे पेमेंट ट्रान्स्फर केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कंपनीने ऑर्डर केलेल्या खुर्च्याची डिलीव्हरी केली नाही. वारंवार विचारणा करुनही जावेद खानकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी पैसे परत केले नाही. कंपनीकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच प्रविण धेनक यांनी कंपनीच्या वतीने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर नोव्हेंबर २०२३ रोजी जावेद खानविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या जावेदला दिल्लीतून पोलिसांनी अटक केली. त्याला पुढील चौकशीसाठी नंतर मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.