मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ डिसेंबर २०२४
मुंबई, – ताडदेव येथील अपघातात सागर दिलीप वाकचौरे या ३० वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी आरोपी बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघताानंतर आरोपी बाईकस्वार पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. भरवेगात जाणार्या एका बाईकची दुसर्या बाईकला धडक लागल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात बुधवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास ताडदेव येथील ताडदेव सर्कल ते भाटिया हॉस्पिटलदरम्यान झाला. मंथन दिपक वाकचौरे ही सतरा वर्षांची ती ताडदेव येथील तुळशीवाडी परिसरात राहते. मृत सागर हे तिचे काका आहेत. मंगळवारी रात्री साडेबारा वाजता काकासोबत त्यांच्या ऍक्टिव्हा बाईकवरुन नाना चौकच्या दिशेने जात होती. ही बाईक ताडदेव सर्कलहून भाटिया हॉस्पिटलच्या दिशेने जात होती. यावेळी एका बाईकस्वाराने भरवेगात येऊन त्यांच्या बाईकला कट मारली होती. त्यामुळे सागर वाकचौरे यांचा बाईकवरील ताबा सुटला आणि ते दोघेही खाली पडले. हेल्मेट न घातल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
जखमी झालेल्या सागर यांना भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची दुखापत गंभीर असल्याने त्यांना नंतर नायर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान पहाटे साडेचार वाजता त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी मंथन वाकचोरे हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात बाईकस्वाराविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका ३० वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर आरोपी बाईकस्वार पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.