मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 मार्च 2025
मुंबई, – विविध टास्टच्या बहाण्याने गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका कापड व्यापारी महिलेची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या दोन ठगांना गुरुवारी बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. तेजस विलास धेदर आणि अभिषेक दयानंद कांबळे अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडी आहेत. फसवणुकीसाठी या दोघांनी सायबर ठगांना बँक खाती दिल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांच्या अटकेने ऑनलाईन फसवणुकीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
51 वर्षांची तक्रारदार महिला ही कापड व्यापारी असून ती कांदिवली येथे राहते. तिचे मालाडच्या एव्हरशाईननगर परिसरात कपड्याचे दुकान आहे. फेब्रुवारी महिन्यांत तिला एका अज्ञात व्यक्तीने एक मॅसेज पाठवून गुगल मॅपवरुन फाईव्ह स्टार रेटींग दिल्यास कमिशन देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे तिने एका हॉटेलला रेटिंग दिले होते. त्यानंतर तिच्या बँक खात्यात दोनशे रुपये जमा झाले होते. याच दरम्यान तिने विविध टास्क पूर्ण केले होते. त्यातून तिच्या बँक खात्यात 5 हजार 770 रुपये जमा झाले होते. त्यामुळे तिला त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला होता. त्यानंतर तिला एक लिंक पाठवून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने विविध टास्क पूर्ण करताना एक लाख दोन हजाराची गुंतवणुक केली होती, या टास्कवर तिला चांगला फायदा झाल्याचे दिसून येत होते.
मात्र टास्क पूर्ण करुनही तिला कमिशनची रक्कम मिळाली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी तिला ग्रुपमधून बाहेर काढले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन तेजस आणि अभिषेक या दोघांना संशयितांना ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आले. ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना या दोघांनी फसवणुकीसाठी बँक खाती पुरविली होती. याच बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर होत होती. ही रक्कम संबंधित ठगांना दिल्यानंतर त्यांना काही रक्कम कमिशन म्हणून मिळत होती. तपासात ही माहिती उघडकीस येताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.