टास्कच्या नावाने कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी महिलेची फसवणुक
सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – घरबसल्या पैसे कमवा अशी जाहिरात करुन विविध टास्कच्या नावाने एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी महिलेची सुमारे सव्वानऊ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका आरोपीस मेघवाडी पोलिसांनी अटक केली. दिपक रमेश मोरे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम जमा झाली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
हर्षा जवाहरलाल बरनवाल ही महिला अंधेरीतील पंपहाऊस परिसरात राहत असून मालाडच्या एका खाजगी कंपनीत ती सिनिअर लॉजिस्टिक एक्झिक्युटिव्ह म्हणून कामाला आहे. 20 डिसेंबरला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला इंटाग्रामवर वर्क फ्रॉम होमसंदर्भात एक जाहिरात दिसली होती. त्यात ज्वेलरीचे व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील असे नमूद केले होते. त्यामुळे तिने त्या लिंकवर क्लिक केले होते. त्यानंतर तिचा व्हॉटअप क्रमांक एका ग्रुपमध्ये अॅड झाला होता. त्यानंतर तिला वेगवेगळे ज्वेलरीचे फोटो पाठविण्यात आले होते. तिने त्या सर्व ज्वेलरीला लाईक केल्यानंतर तिच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ लागले.
सुरुवातीला तिला कमिशनचे रक्कम देऊन त्यांनी तिचा विश्वास संपादन केला, मात्र नंतर तिला प्रत्येक टास्कला काही रक्कम भरण्यास सांगण्यात आले. या टास्कमध्ये तिला दुप्पट कमिशनचे आमिष दाखविणत आले होते. त्यामुळे तिने वेगवेगळ्या पैसे ट्रान्स्फर केले होते. दोन हजाराच्या गुंतवणुकीवर तिला पाच हजार रुपये मिळाले होते. त्यामुळे तिने तिने आणखीन पैसे ट्रान्स्फर करुन टास्क पूर्ण केले होते. एका टास्कदरम्यान तिच्याकडे चूक झाली होती. त्यामुळे तिचे खाते बंद झाले होते. ते खाते पुन्हा सुरु करण्यासाठी त्यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे खाते पुन्हा सुरु करण्यासाठी त्यांना दिड लाख रुपये पाठविले होते. तिच्या एका चुकीमुळे तिचा क्रेडिट स्कोर शंभरहून ऐंशी टक्के झाले होते.
शंभर टक्के के्रडिट स्कोर करण्यासाठी दोन लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले होते, त्यामुळे तिने दोन लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. अशा प्रकारे तिने विविध टास्क, खाते आणि क्रेडिट स्कोरसाठी वेगवेगळ्या बँक खात्यात सुमारे सव्वानऊ लाख रुपये झाले होते. मात्र विविध टास्क पूर्ण करुन तिला तिच्या गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर सोळा लाख रुपयांची प्रॉफिटची रक्कम मिळाली होती. ही रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांनी तिला 30 टक्के टॅक्स भरावा लागेल असे सांगितले. मात्र तिने टॅक्सची रक्कम भरण्यास नकार दिला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने मेघवाडी पोलिसांत संबंधित आरोपींविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी चौदा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा मेघवाडी पोलीस ठाण्यातील सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु केला होता. यातील दहा ते बारा बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्यामुळे या बँक खात्यासह संबंधित खातेदारांची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी दिपक मोरे याला ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता.
फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना बँक खाते पुरविले होते. त्याच्याच खात्यात हर्षा बरनवाल हिच्या बँक खात्यातून काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर दिपकला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.