मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑगस्ट 2025
मुंबई, – टास्कच्या माध्यमातून चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची सुमारे सहा लाखांची फसवणुक केल्याच्या कटातील एका मुख्य वॉण्टेड आरोपीस ओशिवरा पोलिसांनी गोवा येथून अटक केली. अमन पास्कर परमार असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मध्यप्रदेशच्या इंदोरचा रहिवाशी आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने टास्क फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तक्रारदार जोगेश्वरी परिसरात राहतो. जून महिन्यांत तो त्याच्या घरी होता. यावेळी त्याला विजय नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन टेलिग्रामवर नोकरीचे आमिष दाखवून विविध टास्कच्या माध्यमातून चांगले कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला त्याने त्याने काही टास्क पूर्ण केले. या टास्कनंतर त्याच्या बँक खात्यात कमिशनची रक्कम जमा झाली होती. त्यामुळे त्याचा विश्वास निर्माण झाला आणि त्याने पुढील टास्क पूर्ण केले होते. काही दिवसांनी त्याला आणखीन चांगल्या कमिशनचे आमिष दाखवून टास्कसाठी काही रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यामुळे त्याने सहा लाख नऊ हजार रुपयांची गुंतवणुक करुन त्याचे सर्व टास्क पूर्ण केले होते, मात्र ते टास्क पूर्ण करुन त्याला मूळ रक्कमेसह कमिशनची रक्कम मिळाली नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. तपासात फसवणुकीची काही रक्कम अमन परमार याच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्याच्या बँक खात्याची माहिती काढल्यानंतर त्याने मिरा-भाईंदर दिलेला पत्ता बोगस होता. त्याचे बँक स्टेटमेंटची पाहणी केल्यानंतर त्याने चेक आणि एटीएमद्वारे काही रक्कम काढली होती. त्यानंतर एटीएम सेंटरचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची ओळख पटविण्यात आली होती. त्याच्या मोबाईलवरुन तो गोवा येथे असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रितम बानावली, पोलीस निरीक्षक प्रभात मानकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे, सहाय्यक फौजदार अशोक कोंडे, शिपाई विक्रम सरनोबत, स्वप्नील काकडे यांनी गोवा येथून अमर परमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल, दोन सिमकार्ड जप्त केला आहे.