चोरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड टॅटू आर्टिस्टला अटक
चोरीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जानेवारी २०२५
मुंबई, – चोरीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड टॅटू आर्टिस्टला एक वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. उद्धव नाना निकम ऊर्फ उदय असे या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध चोरीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी वनिता गायकवाड या सराईत आरोपी महिलेस पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनी वांद्रे येथे एका वयोवृद्ध रियल इस्टेट व्यावसायिकाच्या घरी अकरा लाखांची चोरी केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत उद्धव निकम हा गेल्या एक वर्षांपासून फरार होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सलीम हसा ज्युदा हे ७१ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार वांद्रे येथील माऊंट मेरी रोड, युवान अपार्टमेंटमध्ये राहतात. ते रियल इस्टेट व्यावसायिक असून त्यांचा व्यवसाय त्यांच्या राहत्या घरातून चालतो. गेल्या वर्षी त्यांची मोलकरणी काम सोडून गेली होती. त्यामुळे त्यांनी अपार्टमेंटच्या सुरक्षारक्षकाकडे मोलकरणीविषयी माहिती विचारली होती. त्याने त्यांच्या घरी वनिता गायकवाड ऊर्फ सिल्वी नावाच्या एका महिलेस पाठविले होते. ५ एप्रिल २०२४ रोजी सिल्वी ही त्यांच्या घरी घरकामासाठी आली होती. काही तास काम केल्यानंतर ती कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती.हा प्रकार संशयास्पद वाटताच सलीम व त्यांची पत्नी अल्मास यांनी कपाटातील दागिन्यांची पाहणी केली होती. यावेळी त्यांना कपाटातील सुमारे अकरा लाखांचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. सिल्वीने घरकाम करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करुन पहिल्याच दिवशी कपाटातील अकरा लाखांच्या दागिन्यांची हातसफाई करुन पलायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलिसांना ही माहिती सांगितली होती. सलीम ज्युदा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सिल्वीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना वनिता गायकवाड ऊर्फ सिल्वी हिला गेल्या महिन्यांत पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत तिला उद्धव निकम याने मदत केली होती. तो तिच्यासोबत घरात घरगडी म्हणून काम मिळवून नंतर तिथे चोरी करुन पळून जात होता. त्यामुळे त्याचा पोलिसाकडून शोध सुरु होता. गेल्या एक वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अखेर त्याला शनिवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पुढील कारवाईसाठी वांद्रे पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.
चोरीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्धव हा टॅटू आर्टिस्ट असून चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या चौकशीतून अशाच काही चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.