दिल्लीतील स्फोटानंतर दशहतवादी हल्ल्याच्या धमकीने खळबळ
संपूर्ण नेव्हल डॉक परिसराची पोलिसांकडून कसून तपासणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 नोव्हेंबर 2025
मुंबई, – दिल्लीतील स्फोटानंतर अंधेरीतील गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडल्याची घटना ताजी असताना आता नेव्हल डॉक येथे दहशतवादी हल्ला होणार असल्याचा एक निनावी कॉल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या कॉलनंतर मुंबई पोलिसांनी श्वान पथकासह बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने संपूर्ण परिसराची पाहणी केली होती, मात्र कुठेही काहीही आक्षेपार्ह व्यक्ती सापडली नाही. त्यामुळे दशहतवाद हल्ल्याची ही बातमी अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याचे नाव जहॉगीर शेख असून तो आंधप्रदेशचा रहिवाशी असल्याचे सांगितले होते, त्यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
यातील तक्रारदार सध्या मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये कार्यरत आहेत. शनिवारी रात्री आठ वाजता ते कामावर हजर झाले होते. रात्री साडेआठ वाजता कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने त्याचे नाव जहॉगीर शेख असल्याचे सांगून तो सध्या आंधप्रदेशात राहत असे सांगितले. नेव्हल डॉक येथे दहशतवादी हल्ला होणार आहे. त्यामुळे सतर्क रहा असे बोलून कॉल कट केला होता. या घटनेनंतर संबंधित पोलीस कर्मचार्याने ही माहिती वरिष्ठांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या व्यक्तीने त्याचा मोबाईल बंद केला होता.
या घटनेनंतर नेव्हल डॉक परिसरात पोलिसांनी कसून तपासणी सुरु केली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकासह श्वान पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली होती, मात्र त्यात काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याची ती माहिती बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत संबंधित जहाँगीर शेख याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ला होणार असल्याची बोगस माहिती देऊन तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीने दारुच्या नशेत हा कॉल केल्याचे बोलले जाते.