मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ डिसेंबर २०२४
ठाणे, – ट्रेलरचे स्पिड गव्हर्नर सर्टिफिकेट अपडेट करण्यासाठी ३२ हजाराची लाचेची मागणी करुन तेरा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी तिघांवर ठाणे युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात ठाणे आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपीक संदीप संभाजी बासरे, खाजगी व्यक्ती कल्पेश अनंत कडू आणि कपिल वामन पाटील यांचा समावेश आहे. आरटीओ कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांची एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीला मेरीडाईन ट्रान्सपोर्ट कंपनीचे वाहनाचे आरटीओचे काम करण्याचे अधिकार मिळाले होते. या कंपनीचे ३२ ट्रेलरचे स्पिड गव्हर्नर सर्टिफिकेट ऑनलाईन अपडेट करण्यासाठी कंपनीने अर्ज केला होता. याच अर्जासंदर्भात त्यांनी वरिष्ठ लिपीक संदीप बासरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी स्पिड गव्हर्नर सर्टिफिकेट अपडेट करण्यासाठी प्रत्येक ट्रेलरमागे एक हजार असे ३२ हजाराची मागणी केली होती. लाचेची रक्कम नंतर पंधरा हजारावर करण्यात आली होती. चर्चेअंती त्यांच्यात तेरा हजार रुपये देण्याचे देण्याचे ठरले होते. ही लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांनी ठाणे युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यात आली होती.
यावेळी संदीप बासरे यांनी तेरा हजाराची लाच घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर ठाण्यातील आरटीओ कार्यालयात या अधिकार्यांनी सापळा लावला होता. यावेळी तक्रारदारांकडून तेरा हजाराची लाचेची रक्कम संदीप बासरे, कल्पेश कडू आणि कपिल पाटील या तिघांनाही या अधिकार्यांनी अटक केली. या तिघांविरुद्ध कळंबोली पोलीस ठाण्यात भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७, ७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक गजानन राठोड, संजय गोविलकर, सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.