जामिनासाठी आरोपीच्या भावाकडे दहा लाखांची लाचेची मागणी
गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्याविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
वसई, – जामिनासाठी आरोपीच्या भावाकडे दहा लाख रुपयांची लाचेची मागणी करुन पाच लाखांची घेण्याची तयारी दर्शविणार्या काशिमिरा गुन्हे शाखेच्या एका पोलीस अधिकार्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कैलास जयवंत टोकळे असे या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
यातील तक्रारदाराच्या भावाविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांचा तपास नंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकळे यांच्याकडे होता. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या भावाने त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या भावाला जामिन मिळवून देण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी त्याने त्यांच्याकडे दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्याचा पहिला हप्ता पाच लाख रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून कैलास टोकळे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कैलास टोकळे यांनी लाचेची ही रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काशिमिरा पोलीस ठाण्यात भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तपास करत आहेत.