लाचेची २९ हजाराची रक्कम घेऊन पोलीस कर्मचार्‍याचे पलायन

निजामपुरा पोलीस ठाण्याच्या घटनेने पोलिसांमध्ये एकच खळबळ

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
ठाणे, – लाचेची रक्कम घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आलेल्या एका पोलीस नाईकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावल्याची जाणीव होताच लाचेची २९ हजाराची रक्कम घेऊन त्याने पोलीस ठाण्यातून पलायन केल्याची धक्कादायक घटना निजामपुरा पोलीस ठाण्यात घडली. निळकंठ सुभाषराव खडके असे या आरोपी पोलीस नाईकचे नाव असून पळून जाताना त्याने पोलीस उपअधिक्षक विशाल जाधव यांना जोरात धक्का दिला, त्यात त्यांना दुखापत झाली आहे. या संपूर्ण घटनेने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी निळकंठ खडके यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे.

यातील तक्रारदार निजामपुराचे रहिवाशी असून काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध निजामपुरा पोलीस ठाण्यात ३५३ ३२३, २९४, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांत तक्रारदारांना अटक न करण्यासाठी त्यांच्याकडे पोलीस नाईक निळकंठ खडके यांनी तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच दिली नाहीतर त्यांच्यावर अटकेची कारवाईची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून निळकंठ खडके यांच्याविरुद्ध ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्यांनी तक्रारदाराकडून तडजोडीअंती २९ हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर मंगळवारी या अधिकार्‍यांनी सापळ्याचे आयोजन केले होते. ठरल्याप्रमाणे मंगळवारी निळकंठ खडके हा त्याच्या बाईकवरुन आला होता. त्यांना बाईकवर बसण्यास सांगून तो त्यांना घेऊन काही अंतरापर्यंत घेऊन गेला, आदर्श पार्कजवळ येताच त्याने त्यांच्याकडून २९ हजाराची लाच स्विकारली. लाचेची रक्कम घेऊन तो नंतर निजामपुरा पोलीस ठाण्यात आला होता. मात्र पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ट्रप लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पळून जाणार्‍या निळकंठ यांना पोलीस उपअधिक्षक विशाल जाधवसह इतर पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने विशाल जाधव यांना जोरात धक्का दिला, त्यात त्यांना दुखापत झाली होती. त्यानंतर तो लाचेची रक्कम घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती विशाल जाधव यांनी वरिष्ठांना दिली होती. वरिष्ठांच्या आदेशांतर निळकंठ खडके याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. मंगळवारी निजामपुरा पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page