बी समरीसाठी लाच घेणार्या दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल
एक लाख घेताना शिपायाला अटक तर अधिकारी पळून गेला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ नोव्हेंबर २०२४
मिरारोड, – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत मदत करुन बी समरीसाठी साडेचार लाखांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांविरुद्ध ठाणे युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत प्रथमेश अनिल पाटील या पोलीस शिपायाला एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत अशोक आव्हाळ या कारवाईनंतर पळून गेले आहेत. त्यांचा या अधिकार्यांकडून शोध सुरु आहे. साडेचार लाखांची लाचेची मागणी करुन एक लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईने ठाणे ग्रामीण पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी नया नगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत आव्हाळ यांच्याकडे होता. गुन्हा दाखल होताच ते अमीत आव्हाळ यांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. या गुन्ह्यांत मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यांची बी समरीसाठी त्यांनी तक्रारदाराकडे साडेचार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच लाचेची रक्कम पोलीस शिपाई प्रथमेश पाटील यांना देण्यास सांगितले होते. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अमीत आव्हाळ व प्रथमेश पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमीत आव्हाळ यांनी साडेचार लाखांच्या लाचेची मागणी करुन त्याचा पहिला एक लाखांचा हप्ता प्रथमेश पाटील यांना देण्यास सांगितले होते. त्यानंतर या पथकाने तिथे सापळा लावून एक लाखाची लाच घेताना पोलीस शिपाई प्रथमेश पाटील यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सुरु असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत आव्हाळ हे पळून गेले आहे. या दोघांविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात लाचेची मागणी करुन लाच स्विकारल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर प्रथमेश पाटील यांना बुधवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
ही कारवाई पोलीस अधिक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधिक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली पोळ पोलीस शिपाई भुजबळ, महिला पोलीस शिपाई राखी शिंदे यांनी केली.