मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
ठाणे, – एमडी ड्रग्ज व घातक शस्त्रांसह दोन आरोपींना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. आकिब इक्बाल बागवान आणि भरत शत्रुध्न यादव अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 108 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असा साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस आणि घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
कल्याण येथील आडवली-ढोकाळी, हाजी मलंग रोडवर दिनकर विहार सोसायटी असून या सोसायटीच्या श्री गजानन रेसीडेन्सी इमारतीमध्ये आकिब नावाचा एक व्यक्ती राहत असून त्याच्याकडे एमडी ड्रग्ज आहे. या ड्रग्जची तो विक्री करणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले, हिवरे, कानडे, पोलीस हवालदार ठाकूर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, महिला पोलीस हवालदार पावस्कर, पोलीस शिपाई वायकर, पाटील, शेजवळ, महिला पोलीस शिपाई भोसले यांनी श्री गजानन रेसीडेन्सी इमारतीच्या डी विंग रुम क्रमांक दोनमध्ये छापा टाकून आकीब बागवान या 33 वर्षांच्या आरोपीस ताब्यात घेतले.
त्याच्याकडे पोलिसांना 10 लाख 88 हजार रुपयांचा 108 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. तपासात आकिब हा ड्रग्जच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्याचयाविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात अन्य दोन गुन्ह्यांची नोंद आहे. या दोन्ही गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर या पथकाने भरत यादव या आरोपीस अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी एमडी ड्रग्ज आणि घातक शस्त्रे असा साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.