एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन आरोपींना अटक

९५ लाखांचा ४७६ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२४
ठाणे, – एमडी ड्रग्जप्रकरणी दोन आरोपींना मुंब्रा येथून ठाण्याच्या ऍण्डी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. तबरेज अबू जाफर बक्षी आणि एजाज शेर खान ऊर्फ पठाण अशी या दोघांची नावे असून ते दोघेही एमडी ड्रग्जच्या आंतरराज्य टोळीचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ४७६ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे ९५ लाख रुपये आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही वर्षांत ठाण्यात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या ड्रग्ज तस्करासह वितरण, साठवणुक, उत्पादन, सेवन करणार्‍या तस्कराविरुद्ध ठाणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असातनाच मुंब्रा परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार हुसैन तडवी यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावीत, पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी, राजेंद्र निकम, पोलीस हवालदार शिवाजी वासरवाड, हेमंत महाले, महेश साबळे, हुसैन तडवी, पोलीस नाईक अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, कोमल लादे यांनी मुंब्रा परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. ठरल्याप्रमाणे मुंब्रा येथील वाय जंक्शन ब्रिज, ठाण्याकडे जाणार्‍या वाहिनीकडील फॉर्चुन हाईट्स अपार्टमेंटसमोर आलेल्या तबरेज बक्षी नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ९२ लाख २० हजार रुपयांचा ४७६ एमडी ड्रग्जचा साठा सापडला.

चौकशीत त्याला ते एमडी ड्रग्ज राजस्थानचा रहिवाशी असलेला एजाज खान ऊर्फ पठाण याने दिल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने एजाजला विरार येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात एजाज हा राजस्थानच्या वर्मडल, साकरिया प्रतापगढ तर तबरेज हा विरारच्या घासकोपरीचा रहिवाशी आहे. एमडी ड्रग्ज विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीने यापूर्वीही एमडीसह इतर ड्रग्जची विक्री केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page