2.38 कोटीच्या हायब्रीड गांजासह इतर ड्रग्जसहीत आरोपीस अटक

ठाणे अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलची मुंब्रा येथे कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 ऑगस्ट 2025
ठाणे, – मुंब्रा परिसरात ड्रग्जची डिलीव्हरीसाठी आलेल्या एका 21 वर्षांच्या तरुणाला ठाणे शहर अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सुमीत राजूराम कुमावत असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. या कारवाईत पोलिसांनी हायब्रीड गांजासह एमडीएमए टॅबलेस असा 2 कोटी 38 लाख रुपयांचा ड्रग्ज जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत सध्या गुरुवार 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. स्वत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अशा ड्रग्ज तस्करांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर ही कारवाई सुरु असताना मुंब्रा येथे काहीजण कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलला मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर-पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, दिपक डुम्मलवाड, पोलीस हवालदार शिवाजी रावते, हरिष तावडे, संदीप चव्हाण, अभिजीत मोरे, अमोल पवार, अमोल देसाई, हुसैन तडवी, अजय सपकाळ, अमीत सपकाळ, नंदकिशोर सोनगिरे, गिरीश पाटील, पोलीस शिपाई आबाजी चव्हाण, पोलीस नाईक अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे यांनी मुंब्रा परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.

रविवारी रात्री उशिरा मुंब्रा येथील जुना टोलनाक्याजवळील बायपास रोड, सिम्बॉयोसीस शाळेसमोर सुमीत कुमावत हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना 2 कोटी 37 लाख 40 हजार रुपयांचा 2 किलो 374 ग्रॅम हायब्रीड गांजा आणि 1 लाख 47 हजार रुपयांचा एमडीएमएच्या एकूण एकोणस टॅबलेस असा 2 कोटी 38 लाख 87 हजार 950 रुपयांचा ड्रग्जचा साठा सापडला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सुमीत हा मूळचा राजस्थानचया जैसलमेरचा रहिवाशी असून सध्या तो मुंबईतील बोरिवली परिसरात राहतो. त्याला ते ड्रग्ज कोणी दिले, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, हायब्रीड गांजा विदेशातून तस्करीमार्गे भारतात आणला जातो. त्यामुळे या गुन्ह्यांत कुठल्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page