सोशल मिडीयाद्वारे पाकिस्तानला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरविली

अटक केलेल्या तीन तरुणांची एटीएसकडून कसून चौकशी सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 मे 2025
मुंबई, – सोशल मिडीयाद्वारे पाकिस्तानला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरविल्याप्रकरणी ठाण्यातील तीन तरुणांना राज्य दशहतवाद विरोधी पथकाने अटक केली. अटकेनंतर तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील एक आरोपी थेट पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या एका अधिकार्‍याशी संपर्कात होता तर इतर दोनजण त्याला मदत करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ठाण्यातील एक तरुण सोशल मिडीयाद्वारे पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह यांना प्रतिबंधित क्षेत्राची माहिती देत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने संबंधित आरोपीवर साध्या वेशात पाळत ठेवली होती. गेल्या काही दिवसांपासून त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता तो नोव्हेंबर 2024 रोजी फेसबुकवर पीआयओच्या एका अधिकार्‍याच्या संपर्कात आला होता. त्यातून त्यांची चांगली ओळख होऊन मैत्री झाली होती.

त्याच्या सांगण्यावरुन त्याने नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत भारतातील प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती व्हॉटअपद्वारे दिली होती. याकामी त्याला त्याच्या दोन सहकार्‍यांनी मदत केली होती. त्यामुळे या दोघांनाही नंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम 1923 कलम 3 (1), (ब), 5 (अ) सह भारतीय न्याय सहिता 61 (2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांनी भारतातील कुठल्या प्रतिबंधित क्षेत्राची माहिती दिली होती, त्यासाठी त्यांनी या क्षेत्राची रेकी केली होती, ते पीआयओच्या कुठल्या अधिकार्‍याच्या संपर्कात होते, या संपूर्ण घटनेत किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला, ते तिघेही इतर कोणाच्या संपर्कात होते, त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page