मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जानेवारी २०२४
ठाणे, – डिसेंबर महिन्यांत सांताक्रुज परिसरातील एका मोबाईल शॉपमध्ये प्रवेश करुन लाखो रुपयांचे मोबाईल चोरी करुन पळून गेलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीस कळवा येथून ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. आदिल मसीउद्दीन खान असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी साडेपाच लाखांचे चोरीचे ११० हून अधिक मोबाईल हस्तगत केले आहेत. अटकेनंतर त्याला चोरीच्या मुद्देमालासह वाकोला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर आदिल खानला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सांताक्रुजच्या कालिना परिसरात झेडेश इंटरप्रायझेज नावाचे एक मोबाईल शॉप आहे. १८ डिसेंबरला रात्री उशिरा या शॉपमध्ये अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन शॉपमधील लाखो रुपयांचे विविध कंपन्यांचे मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार दुसर्या दिवशी उघडकीस येताच अज्ञात चोरट्याविरुद्ध वाकोला पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच कळवा रेल्वे स्थानकात काहीजण चोरीच्या मोबाईलची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई मयुर लोखंडे यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे, रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव, सुनिल माने, पोलीस हवालदार प्रशांत निकुंभ, पोलीस शिपाई मयुर लोखंडे, सागर सुरळकर यांनी कळवा रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
शनिवारी तिथे आदिल खान आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्यानेच सांताक्रुज येथील झेडेश इंटरप्रायझेज या मोबाईल शॉपमधून घरफोडी केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे ११० मोबाईल जप्त केले आहेत. त्याची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपये आहे. या मोबाईलसह आदिलला नंतर वाकोला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून घरफोडीच्या अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.