घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक
५० गुन्ह्यांची उकल करुन ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ फेब्रुवारी २०२५
ठाणे, – ठाण्यासह भिवंडी, बदलापूर, अंंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोडी करणार्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह चोरीचे दागिने विकत घेणारय आरोपी अशा दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. लक्ष्मण सुरेश शिवशरण अणि सुकेश मुद्दणा कोटीयन अशी या दोघांची नावे आहेत. यातील लक्ष्मण हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्याच्या अटकेने ५० हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पपोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील सोन्याचे दागिने आणि कॅश असा ५४ लाख २० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अलीकडेच विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांतील आरोपींचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. हा तपास सुरु असताना लक्ष्मण शिवशरण या संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत लक्ष्मण हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा सोलापूरच्या रुपा भवानी माता मंदिराजवळील हनुमाननगर परिसरातील रहिवाशी असून सध्या भिंवडीतील काल्हेर, कशेळी गावात राहतो. लक्ष्मणने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक घरफोडी केल्याची कबुली दिली.
त्याच्या अटकेने विष्णूनगर, महात्मा फुले, खडकपाडा, डोबिवली कोळशेवाडी, मानपाडा, टिळकनगर, शिवाजीनगर, बदलापूर, मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट, बाजारपेठ, कोळसेवाडी, भिवंडी शहर, कोनगांव, चितळसर, कापूरबावडी, भोईवाडा पोलीस ठाण्यातील ५० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले तर त्याच्याविरुद्ध यापूर्वीचे डोबिवली पोलीस ठाण्यात २१, मानपापडा पाच, वागळे इस्टेट, विष्णूनगर प्रत्येकी दोन, बदलापूर व वाशी एपीएमसी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा ३२ गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले आहे.
चोरीचे सोन्याचे दागिने तो सुकेश कोटीयन याच्याकडे विक्रीसाठी देत होता. त्याच्या चौकशीनंतर मंगलोरचा रहिवाशी असलेला सुकेशला पोलिसांनी अटक केली. सुकेश हा सध्या मिरा-भाईंदर रोड, जीसीसी क्लबजवळील करण कॉम्प्लेक्समध्ये राहत असून तो चोरीचे दागिने विक्रीचे काम करतो. या दोघांकडून पोलिसांनी ६६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ७८ हजार ९०० रुपयांची कॅश असा ५४ लाख २० हजार १८० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, अशोक पवार, बालाजी शिंदे, आदिक जाधव, विलास कडू, अनुप कामत, प्रशांत वानखेडे, गोरखनाथ पोटे, प्रविण बागुल, उल्हास खंदारे, सुधीर कदम, वसंत चौरे, सचिन वानखेडे, दिपक महाजन, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे, सतीश सोनावणे, महिला अंमलदार ज्योत्सना कुंभारे, मिनाक्षी खेडेकर, मंगल गावित, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल बोरकर यांनी केली.