विविध प्रलंबित खटले निकाली काढून ५.९० कोटीचा दंड वसुल

ठाण्याच्या लोकल कोर्टात राष्ट्रीय लोक अदालतीला प्रचंड यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जुलै २०२४
ठाणे, – वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्‍या वाहनचालकाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दंडासंदर्भातील विविध प्रलंबित खटले निकाली काढून ५ कोटी ९० लाख ५३ हजार ६५० रुपयांच्या दंंडाची रक्कम शनिवारी ठाण्यातील विविध लोकल कोर्टात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वसुल करण्यात आली. यंदा राष्ट्रीय लोक अदालतीला प्रचंड यश मिळाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी वाहतूक पोलिसांचे कौतुक केले आहे. सप्टेंबर महिन्यांत पुन्हा राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून त्याचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत काही वाहनचालकाकडून सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लघंन होत असल्याने ठाण्यातील वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. या वाहनचालकाकडून वेळोवेळी दंड आकारला जातो. त्यासाठी वाहतूक पोलिसंाकडून दंडाचे चलन वाहनचालकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसुली केली जात होती. मात्र काही वाहनचालकांनी दंडाची रक्कम न भरल्याने अशा चालकांवर खटला दाखल करण्यत आला होता. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे अनेक खटले प्रलंबित होते. ती प्रकरणे निकाली काढण्याासठी लोकल कोर्टाकडून दर महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते. याच कालावधीत जास्तीत जास्त वाहनचालक, सर्वसामान्य नागरिकांना लोक अदालत तसेच त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यांमध्ये तडजोडीअंती दंडाची रक्कम कमी होईल याचे महत्त्व पटवून देण्यात आले होते.

शनिवारी २७ जुलै २०२४ रोजी ठाणे आयुक्तालयातील सर्व लोकल कोर्टात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी हेल्प डेस्कच्या माध्यमातून ठाणे पोलिसांनी सर्वसामान्य लोकांना लोक अदालतीचे महत्त्वाचे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्याला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे ठाणे वाहूक विभागातील एकूण अठरा युनिटमध्ये दाखल असलेल्या खटल्यापैकी ८ हजार ४४४ खटले लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले. त्यात ७४ लाख ७५ हजार ०५० रुपयाचंा दंड वसुल करण्यात आला आहे. लोक अदालतीसंदर्भात पाठविण्यात आलेल्या नोटीसमुळे नागरिकांनी ४ कोटी ९७ लाख १८ हजार ४५० रुपयांच्या दंडाची रक्कम जमा केली आहे. तसेच २७ जुलैला लोक अदालतीच्या दिवशीच २ हजार ६८५ चलनाची एकूण १८ लाख ६० हजार १५० रुपयांच्या दंडाची रक्कम चालकांनी थेट जमा केली होती. अशा प्रकारे यावेळेस राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५ कोटी ९० लाख ५३ हजार ६५० रुपयांचा दंडाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

यंदा राष्ट्रीय लोक अदालतीला मिळालेला प्रतिसाद पाहता प्रलंबित खटले तडजोडीअंती लोकल कोर्टाच्या माध्यमातून निकाली काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. सप्टेंबर २०२४ रोजी पुन्हा राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून त्यात जास्तीत जास्त प्रलंबित खटले निकाली काढण्यावर ठाणे पोलीस भर देणार आहे. यावेळी ठाणे पोलिसांनी सर्व नागरिकांना या मोहीमेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन सर्व नागरिकांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page