एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना अटक

4.12 कोटीच्या 2 किलो 62 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2026
ठाणे, – एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सोहेल दिलीप खान, रोहित विलास सितापुरे आणि राजेश हडावले अशी या तिघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसाीं 2 किलो 62 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत 4 कोटी 12 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर तिघांनाही लोकल कोर्टाने शनिवार 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही वर्षांत शहरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती, त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काहीजण ठाण्यातील चरई परिसरात एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार गिरीश पाटील यांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर-पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिपक डुम्मलवाड, राजेंद्र निकम, मोहन परब, पोलीस हवालदार अमोल देसाई, संदीप चव्हाण, हरि तावडे, नंदकिशोर सोनगिरे, अमोल पवार, हुसैन तडवी, अजय सपकाळ, अमीत सपकाळ, अभिजीत मोरे, गिरीश पाटील, पोलीस शिपाई आबाजी चव्हाण, पोलीस नाईक अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे यांनी चरई, एमटीएनएल कार्यालयासमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती.

सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजता तिथे सोहेल खान आणि रोहित सितापुरे हे दोघेही आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 2 किलो 62 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत 4 कोटी 12 लाख रुपये इतकी आहे. तपासात ते दोघेही एमडी ड्रग्जच्या डिलीव्हरीसाठी आले होते. त्यांच्या चौकशीत राजेश हडावले याचे नाव समोर आले होते, त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. यातील सोहेल व राजेश हे दोघेही ठाण्याच्या कोपरी तर रोहित हा उल्हासनगर, गायकवाड पाडा क्रमांक दोन परिसरात राहतो.

या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना मंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते एमडी ड्रग्ज कोणी दिले, ते कोणाला देण्यासाठी तिथे आले होते, त्यांनी यापूर्वीही एमडी ड्रग्जची विक्री केली आहे, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page