अनैतिक संबंधातून 50 वर्षांच्या प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या प्रियकराला काही तासांत अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
ठाणे, – अनैतिक संबंधातून शोभा दगडूबा जाधव या 50 वर्षांच्या महिलेने तिच्याच प्रियकराने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मनोज पुंडलिक सैदाने या 48 वर्षांच्या आरोपी प्रियकराला काही तासांत वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्यानेच शोभाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी दहा ववाजता ठाण्यातील लोकमान्य नगर, संतोष पाटील यांच्या कार्यालयाजवळ घडली. विशाल दगडूबा जाधव हा 27 वर्षांचा तरुण ठाण्यात राहत असून डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. शोधा ही त्याची आई असून त्याचे वडिल दगडूबा यांचे निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शोभा हिचे आरोपी मनोज याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तो बिहारी कामगार असून ठाण्याच्या लोकमान्य नगर, पाडा क्रमांक तीन परिसरात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून शोभा आणि मनोज यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होता. त्यातून तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन पुन्हा वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात मनोजने शोभाची दगडाने ठेचून हत्या केली होती. या हत्येनंतर तो पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या शोभाला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी विशाल जाधव याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मनोज सैदाने याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत मनोजला पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण माने, पोलीस निरीक्षक विठ्ठल चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेशकुमार शिरसाठ, प्रशांत शिर्के, सुहास रहाणे, पोलीस उपनिरीक्षक सागर कौटकर, मेघराज जाधव व अन्य पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने अनैतिक संबंधातून त्याने शोभाची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.