हत्येच्या गुन्ह्यांतील मोस्ट वॉण्टेड आरोपींना सात वर्षांनी अटक

आरोपीविरुद्ध उत्तरप्रदेशातून ५० हजाराचे ईनाम जाहीर

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२४
ठाणे, – सात वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशात झालेल्या एका हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना ठाण्यातून उत्तरप्रदेश एसटीएफ आणि खंडणीविरोधी पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. मोनू ऊर्फ विभास ऊर्फ प्रशांत कपिल शुक्ला आणि रजत ऊर्फ प्रभात कपिल शुक्ला अशी या दोघांची नावे असून ते दोघेही ठाण्यातील जुना म्हाडा वसाहत, वसंत विहार अपार्टमेंटचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी उत्तरप्रदेश पोलिसांच्या एसटीएफ पथकाकडे सोपविण्यात आले होते. ताबा मिळताच त्यांना पुढील चौकशीसाठी उत्तरप्रदेशात नेण्यात आले आहे. सात वर्षांपासून फरार असलेल्या दोन्ही आरोपीच्या अटकेसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी ५० हजार रुपयांचे ईनाम जाहीर केले होते.

२०१७ साली मोनू शुक्ला आणि रजत शुक्ला या दोन आरोपीविरुद्ध उत्तरप्रदेशच्या मेजा पोलीस ठाण्यात ३०२, ५०४, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. गेल्या सात वर्षांपासून ते पोलिसांना सतत गुंगारा देत होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी ५० हजार रुपयांचे ईनाम जाहीर केले होते. या दोघांचा शोध सुरु असतानाच उत्तरप्रदेशच्या एसटीएफ पोलिसांना संबंधित आरोपी ठाण्यातील वसंत विहार परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या एसटीएफचे एक विशेष पथक ठाण्यात आले होते. या पथकाने खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती सांगून आरोपींच्या अटकेसाठी मदत करण्याची विनंती केली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्‍वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयागराजच्या एसटीएफचे पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र सिंह, रणेंद्र सिंह, मुख्य आरक्षी अभिषेक मिश्रा, विकास तिवारी, अजयकुमार यादव, किसनचंद, रविकांत सिंह तसेच ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोंकणे, संजय बाबर, पोलीस हवालदार योगीराज कानडे, संदीप भोसले, संजय राठोड, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस शिपाई तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, पोलीस नाईक चालक भगवान हिवरे यांनी आरोपींची माहिती काढून त्यांचे मोबाईल क्रमांक प्राप्त केले होते.

या माहितीनंतर या पथकाने ठाण्यातील मुल्लाबाग, निळकंठ बुडस समोरील चौकात आलेल्या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या दोघांनी स्वतची माहिती सांगण्यास टाळाटाळ केली होती. मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांची नावे मोनू ऊर्फ प्रशांत शुक्ला आणि रजत ऊर्फ प्रभात शुक्ला असल्यासचे सांगितले. हत्येच्या गुन्ह्यांत गेल्या सात वर्षांपासून वॉण्टेड असलेले ते दोघेही तेच आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. उत्तरप्रदेशातून हत्या केल्यानंतर ते दोघेही काही महिन्यांपासून वसंत विहारच्या पहिल्या मजल्यावरील १२४/१४ मध्ये राहत होते. स्वतची ओळख लपविण्यासाठी त्यांनी फारसे कोणाशी संबंध ठेवले नाही. अटकेनंतर या दोघांचा ताबा नंतर एसटीएफ पोलिसांकडे सोपविण्यत आला होता. सायंकाळी त्यांना संबंधित पोलीस उत्तरप्रदेशला निघून गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page